लोकांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाईचे युवानेते डॉ.विखेंचे आश्वासन
राहाता प्रतिनिधी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला जनता दरबार राहाता तालुक्यातील खडकेवाके येथील फूड टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
जिल्ह्यातील विविध भागांतून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या थेट मांडल्या. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद,विविध विषयांवरील प्रश्नांची मांडणी आणि तातडीने दिलेले निर्देश यामुळे हा जनता दरबार विशेष लक्षवेधी ठरला.
दुपारी ३ वाजता सुरू झालेला हा जनता दरबार सायंकाळी ७ वाजेपर्यंत अखंडपणे सुरू होता. तब्बल चार तासांच्या कालावधीत शेकडो नागरिकांनी आपल्या अडचणी,तक्रारी आणि मागण्या मांडल्या. पाणीपुरवठा समस्या,रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सेवांमधील अडथळे, शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात होणाऱ्या अडचणी तसेच विविध प्रशासकीय प्रश्न यांचा मोठ्या प्रमाणावर ऊहापोह करण्यात आला. विविध गावांमधून आलेल्या शिष्टमंडळांनी संघटितपणे आपले प्रश्न मांडले.
या सर्व तक्रारींवर डॉ.सुजय विखे पाटील यांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने दखल घेतली. प्रत्येक अर्ज, प्रत्येक निवेदन काळजीपूर्वक ऐकून त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तत्काळ संपर्क साधत कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले. काही प्रकरणांमध्ये तर त्याच ठिकाणी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले.त्यामुळे नागरिकांना तत्काळ दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जनतेच्या समस्या सोडवणे ही केवळ जबाबदारी नसून ती आपली बांधिलकी आहे.प्रत्येक नागरिकाला न्याय मिळालाच पाहिजे, असे ठाम मत यावेळी डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केले. प्रशासन आणि जनतेमध्ये थेट संवाद निर्माण होणे आवश्यक असून अशा जनता दरबाराच्या माध्यमातून समस्यांचे त्वरित निराकरण शक्य होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान,सीआरपी कम्युनिटी रिसर्च पर्सन समुदायाच्या वतीने शिर्डी मतदारसंघातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या घरगुती उत्पादनांचा संच डॉ. विखे पाटील यांना भेट म्हणून प्रदान करण्यात आला. महिलांनी स्वतः तयार केलेल्या शेवया आणि कुरडया यांचा समावेश असलेल्या या भेटीमागे त्यांच्या स्वावलंबनाचा आणि आत्मविश्वासाचा प्रत्यय येत होता.या प्रसंगी महिलांनी आपल्या उपक्रमांची माहिती देत शासनाच्या विविध योजनांमुळे त्यांना मिळालेल्या संधीबद्दल समाधान व्यक्त केले.
डॉ. विखे पाटील यांनी महिला बचत गटांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या उत्पादनांना अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील,असे आश्वासन दिले. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.
जनता दरबाराच्या यशस्वी आयोजनामध्ये स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. कार्यक्रम दरम्यान शिस्तबद्ध नियोजन, नागरिकांच्या समस्यांची नोंदणी, तक्रारींचे वर्गीकरण आणि तत्काळ कार्यवाही यामुळे संपूर्ण प्रक्रिया प्रभावीपणे पार पडली.
