चांदवड प्रतिनिधी नुकतेच चांदवड येथील ऐतिहासिक रंगमहाल (होळकर वाडा) येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या सोहळ्यास शालेय शिक्षणमंत्री नामदार. दादा भुसे यांनी उपस्थिती लावली.
या वेळी मार्गदर्शन करताना नामदार भुसे म्हणाले, "राजा कसा असावा, याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या कार्यातून संपूर्ण भारताला दाखवून दिले आहे. त्यांनी केलेली विकासकामे आजही प्रेरणादायी ठरतात. हा चांदवडचा रंगमहाल, मालेगावच्या मोसम नदीवरील पूल,तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी मालेगावमध्ये त्यांनी बांधलेल्या तीन पुरातन विहिरी – हे त्यांच्या दूरदृष्टीचे जिवंत उदाहरण आहे."
त्यांनी पुढे सांगितले की, "संपूर्ण देशभरात अहिल्यादेवींनी विविध ठिकाणी विकासकामे केली आहेत.आज महाराणा प्रताप यांचीही जयंती असल्याने हा प्रसंग दुग्धशर्करा योग ठरत आहे. भविष्यात या रंगमहालात येणाऱ्या भाविकांसाठी हे स्थान एक प्रेरणादायी ठिकाण बनेल."
यावेळी नामदार भुसे यांनी राजमहालाची पाहणी केली. त्यांनी पुरातन वास्तूंची माहिती घेतली व रंगमहालातील ऐतिहासिक रचना व वैशिष्ट्यांचे त्यांनी कौतुक केले.
या विशेष प्रसंगी महाराज श्रीमंत शिवाजीराव होळकर, युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर, श्रीमंत अमरजितराजे जहांगीरदार, आ.. राहुल आहेर, ना गिरीश महाजन, ना. जयकुमार रावल, सौ. चित्रा वाघ, श्री. बनकर. भाऊसाहेब चौधरी यांच्यासह असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली