आश्वी खुर्द संजय गायकवाड गत दहा ते बारा वर्षांपासून सर्मपित निस्वार्थीपणे विषारी साप पकडून त्यांना जंगलात सोडून जीवदान देणारे आश्वी खुर्दचे भूषण ठरलेले विलास शिवाजी गायकवाड यांना नुकतेच महाराष्ट्र शासन पुणे वन विभाग व वन्यजीव रक्षक संस्था मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ येथे ‘वन्यजीवरक्षक पुरस्कार’ स्मृतीचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला.
प्रसंगी बोलताना सत्कारमूर्ती सर्पमित्र विलास गायकवाड बोलताना म्हणाले की कुठल्याही सापांना भिती पोटी मारु नका त्यामुळे निसर्गाची हानी होते, सापाची जात ओळखायला शिका रात्री अपरात्री घरा-दारात साप आढळल्यास मला फोन करा.
हा मानाच्या पुरस्कार मिळाल्याबद्दल गावच्या वतीने आश्वी खुर्द सहकारी दूध उत्पादक संस्थेत त्यांचा यथोचित सपत्नीक सत्कार करण्यात आला.
विलास गायकवाड हे वन्यजीव रक्षक मावळ या संस्थेत कार्यरत असुन त्यांनी आतापर्यंत दोन ते अडीच हजार सापांना जीवदान दिले आहे. त्यात नाग,मण्यार, फुरसे,घोणस,चापडा यांसारखे विषारी साप तर हरणटोळ, कवड्या, दिवड,धामण, गवत्या, ननाटी, तस्कर अशा निरुपद्रवी सापांचा समावेश आहे.रात्री अपरात्री केव्हाही मदतीसाठी फोन आला तरी त्यांनी तत्काळ धावून जाऊन सापांना सुरक्षित पकडून निसर्गात सोडले आहे.
या सत्कार सोहळ्यास सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष मकरंद गुणे विखे पाटील, कारखान्याचे मा. संचालक बाळासाहेब मांढरे, डॉ. दिनकर गायकवाड, संतोष भडकवाड,कैलास गायकवाड, संजय गायकवाड, दिलीप मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.
गावच्या भूषणाचा असा गौरव झाल्याने आश्वी खुर्द गावाचे नाव उंचावले असून विलास गायकवाड यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
