आदीवासी तरुणाच्या खुणाची सी‌.बी.आय.चौकशी करा-ज्ञानेश्वर अहिरे

Cityline Media
0
ज्ञानेश्वर अहिरे आज पीडित कुटुंबाची भेट घेणार 

बीड प्रतिनिधी जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील पाडळी येथील आदिवासी भिल्ल समाजातील २५ वर्षीय शंकर अंकुश बर्डे या तरुणाची हत्या करण्यात आली असून बीड पोलिसांच्या निष्काळजीपणाचा हा बळी आहे असा गंभीर आरोप करून आदिवासी तरुणाच्या हत्तेची सी.बी.आय.चौकशी करण्यात यावी अन्यथा संपूर्ण राज्यात या हत्तेचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी नुकताच मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
श्री.अहिरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पाडळी येथील गायरान जमिनीत राहणाऱ्या आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबाला गावातील काही गुंड प्रवृत्तीचे लोक दमबाजी करत होते. तुम्हाला गावात राहू देणार नाही. जीवे मारू,तुमची राहते घर पेटवून देऊ,

अशा वेळोवेळी धमक्या देत होते या त्रासाला कंटाळून शंकरची चुलती सुमनबाई अशोक बर्डे यांनी ११ मे रोजी बीड पोलीस अधीक्षकांना लेखी अर्ज दिला होता. त्यामध्ये आम्हाला या लोकांपासून धोका आहे ,आम्हाला आमच्या घरात सुरक्षित राहू द्या तसेच आम्हाला पोलीस संरक्षण द्या.अशी विनवणी करून पोलिसांनी न्याय द्यावा अशी मागणी केली होती.

परंतु पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून कुठलीही कारवाई झाली नाही. व पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे व हलगर्जीपणामुळे या आदिवासी तरुणाचा बळी गेला आहे. पोलिसांनी वेळीच कठोर पावले उचलली असती तर हा हत्याकांड झालाच नसता तेव्हा बीड पोलीस या सर्व प्रकारास जबाबदार आहेत.

शुक्रवारी १५ मे रोजी पाडळी येथील भिल्ल वस्तीवर आरोपी अचानक वाहनातून आले. त्यांनी गायरान जमिनीत का राहता? या कारणावरून वाद घालत घरात घुसले व त्यांनी शंकर बेर्डे या तरुणावर प्राण घातक हल्ला केला. हल्लैखोरांनी काठ्या, दगड, आणि लोखंडी रॉडने शंकरला बेदम मारहाण केली.

हल्ल्याच्या वेळी शिरूर पोलिसांना फोन करूनही त्यांनी वेळेत मदत पाठवली नाही. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेतून शंकरला गंभीर अवस्थेत बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी वेळीच मदत केली असती तर शंकरचा जीव वाचला असता.

शंकरची चुलती सुमनबाई यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात आरोपींची नावे दिली होती. व तुम्ही जर घरी आलात तर तुमचे तुकडे करून माशांना खाऊ घालू,अशी धमकी आरोपी देत होते. असा उल्लेख देखील केला होता. मग पोलिसांनी आदिवासींच्या तक्रारीची का दखल घेतली नाही? ११ मे रोजी पोलीस संरक्षण द्या अशी मागणी आदिवासींकडून करण्यात आली होती.

 पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून आदिवासींच्या अर्जाकडे दुर्लक्ष केले? तसेच आदिवासींवर हल्ला झाला त्यावेळी शिरूर कासार पोलिसांना फोन करून घटनेची माहिती देण्यात आली होती. मग पोलिसांनी घटनास्थळी वेळीच का धाव घेतली नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

दिवसा ढवळ्या गायरान जमिनीवरून प्राण घातक हल्ला होतो व त्यातच एकाची हत्या होते परंतु बीड पोलिसांना त्याचे काहीही घेणेदेणे नाही. या सर्व आरोपींना पोलिसांचेच संरक्षण असल्याचे दिसत आहे. तसेच ज्या गायरान जमिनीवरून आरोपींनी आदिवासींवर हल्ला केला ती जमीन शासनाची आहे मग जाणीवपूर्वक आदिवासी तरुणाची हत्या करण्यात आली आहे का? असा संशय निर्माण झाला आहे.

 त्यामुळे आदिवासींचा बीड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच या हत्तेमागे नेमका काय हेतू आहे व पोलीस प्रशासनाने आरोपीला पाठीशी घालण्याचे कारण काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे देखील गरजेचे आहे तरी  मुख्यमंत्र्यांनी या हत्येचा तपास शिरूर पोलिसांकडून काढून सी.बी.आय. कडे द्यावा.अन्यथा पाडळी येथील भिल्ल तरुणाच्या हत्तेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटल्या शिवाय राहणार नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वेळीच निर्णय घ्यावा असा इशारा ज्ञानेश्वर अहिरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!