मृतदेह ओळखीच्या गोंधळामुळे खळबळ,
व्हॉट्सॲप माहितीतील दफन झालेला मृतदेह कुणाचा,प्रश्न कायम.
सोनगाव शहाजी दिघे राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील शब्बीर जमादार मन्सूरी या मतिमंद इसमाच्या प्रकरणाने संपूर्ण परिसरात आश्चर्य आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.हरवल्यानंतर मृत समजून त्याच्यावर धार्मिक रितीरिवाजा प्रमाणे दफनविधी करण्यात आला; मात्र काही दिवसांनी तोच शब्बीर जिवंत अवस्थेत सापडून घरी परतल्याने मृतदेह ओळख प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
प्राप्त माहिती नुसार शब्बीर जमादार मन्सूरी हा काही दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडला होता.मानसिक स्थिती सामान्य नसल्याने कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी त्याचा दोन दिवस शोध घेतला.शोध लागला नसल्याने राहुरी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली.
दरम्यान,संगमनेर तालुक्यातील जोर्वे परिसरात एका अज्ञात इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. संबंधित घटनेची नोंद संगमनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली.उपलब्ध माहिती आणि प्राथमिक ओळखीच्या आधारे हा मृतदेह शब्बीरचा असावा,असा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांना ओळख पटविण्यासाठी बोलावण्यात आले.
शवविच्छेदनानंतर संबंधित मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.कुटुंबीयांनी आणि समाजबांधवांनी तो शब्बीरच असल्याचे समजून धार्मिक परंपरेनुसार दफनविधी केला.घटनेनंतर कुटुंबीय शोकमग्न झाले होते.
मात्र काही दिवसांनी या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले.शब्बीर हा प्रत्यक्षात जिवंत असल्याचे समोर आले.चालत चालत तो अहिल्यानगरच्या पुढील भागात पोहोचला होता. तेथे एका शेतकऱ्याने त्याला थांबवून विचारपूस केली.त्याने भूक लागल्याचे सांगितल्यावर संबंधित शेतकऱ्याने त्याला अन्न दिले.
चर्चे दरम्यान त्याने स्वतःचे नाव शब्बीर आणि आपण सोनगावचा रहिवासी असल्याची माहिती दिली.संशय आल्याने शेतकऱ्याने त्याचा फोटो काढून व्हॉट्सॲप वरील समूहांवर प्रसारित केला. ही माहिती सोनगाव पर्यंत पोहोचल्यानंतर नातेवाईकांनी व्हिडीओ कॉलद्वारे त्याची ओळख निश्चित केली.
त्यानंतर नातेवाईक नगर येथे जाऊन त्याला घेऊन आले.पुढे राहुरी व संगमनेर पोलीस ठाण्यात आवश्यक नोंदी व प्रक्रिया पूर्ण करून शब्बीरला घरी आणण्यात आले.या घटनेनंतर गावात आणि समाजात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
कारण ज्या मृतदेहावर शब्बीर समजून दफनविधी करण्यात आला,तो मृतदेह प्रत्यक्षात कुणाचा होता, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. दरम्यान,मृतदेहाची ओळख निश्चित करताना कोणती प्रक्रिया राबविण्यात आली, ओळख पडताळणी कितपत झाली आणि पुढील तपासात काय निष्पन्न होते,याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. संबंधित यंत्रणांकडून या घटनेची पडताळणी होऊन वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
