लोणी रुपाली भालेराव वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानल्या जाणाऱ्या देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विठुरायाच्या जयघोषाने आणि भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला.आषाढी एकादशीच्या या मंगल प्रसंगी लोणी परिसरासह ग्रामीण भागातूनही अनेक भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती.
सकाळपासूनच विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.
या पवित्र सोहळ्याची सुरुवात सकाळी धार्मिक विधिवत पूजेने झाली.विश्वस्तांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीची महापूजा व अभिषेक अत्यंत उत्साहात पार पडला.
मंदिर परिसरात विविध प्रकारच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.उपवासाच्या दिवशी भाविकांसाठी साबुदाण्याच्या खिचडीचा विशेष प्रसाद,केळी तसेच पौष्टिक राजगिरा लाडूंचे वाटप यावेळी करण्यात आले,ज्याचा लाभ अनेक भाविकांनी घेतला.
प्रत्यक्षात पंढरपूरच्या वारीत सहभागी होणे किंवा महापूजेसाठी पंढरपूरला जाणे प्रत्येक नागरिकाला शक्य होतेच असे नाही.अशा भाविकांसाठी लोणी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे हक्काचे श्रद्धास्थान ठरले.पंढरपूरला प्रत्यक्ष जाऊ न शकलेल्या भाविकांनी मोठ्या श्रद्धेने व भक्तीभावाने लोणी येथील मंदिरात उपस्थित राहून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले.
दिवसभर चाललेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांच्या मालिकेत सायंकाळच्या सत्रात विशेष भजन व कीर्तनाचा सुरेल संगीत सह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मृदुंग आणि तालाच्या गजरात रंगलेल्या या भजन-कीर्तनाने उपस्थित सर्व भाविक तल्लीन झाले होते. दिवसभर मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी आणि वर्दळ पाहायला मिळाली,ज्यामुळे संपूर्ण लोणी विठ्ठलमय होऊन गेली होती.
