एक गट,एक गणपती; विसर्जनासाठी पर्यावरणपूरक उपक्रम
लोणी रुपाली भालेराव गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि आनंदाचा सण असला तरी त्यासोबत पर्यावरणाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.याच विचारातून राहता तालुक्यातील प्रिंपरी निर्मळ येथील सरस्वती महिला शेतकरी गट, पिंपरी निर्मळ यांच्या वतीने यंदा ‘एक गट, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. विशेष म्हणजे गणपती विसर्जनासाठी विहीर, तलाव किंवा इतर नैसर्गिक जलस्रोतांचा वापर न करता टपामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय गटाने घेतला आहे.
गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर त्या पाण्याचा उपयोग वृक्षारोपणासाठी करण्याचा पर्यावरणपूरक संकल्पही महिलांनी केला आहे. त्यामुळे धार्मिक श्रद्धा जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे.
यावेळी गटाच्या अध्यक्षा सौ.मीना निर्मळ म्हणाल्या, “आपण गणपती बाप्पाला दहा दिवस लहान बाळासारखा जीव लावतो. त्याची मनोभावे पूजा करतो. मात्र दहा दिवसांनंतर त्याच गणपतीला तलावात किंवा विहिरीत विसर्जित करताना अनेकदा मूर्तीचे हात-पाय तुटतात, मूर्तीची विटंबना होते.
त्याचबरोबर विसर्जनाच्या साहित्यामुळे पाणीदेखील दूषित होते.त्या पुढे म्हणाल्या, “यापेक्षा टपामध्ये गणपतीचे विसर्जन केले, तर मूर्तीची विटंबना टाळता येईल आणि पाण्याचाही अपव्यय होणार नाही. हे पाणी वृक्षारोपणासाठी वापरले, तर पर्यावरणाचे रक्षण होण्यासोबतच गणपती बाप्पाच्या विसर्जनातूनही निसर्ग संवर्धनाचा संदेश देता येईल.
महिलांच्या या उपक्रमातून ‘श्रद्धा जपा, पण निसर्गही जपा’ असा संदेश देण्यात आला असून, गणेशोत्सवाला पर्यावरणपूरक दिशा देण्यासाठी गावातील नागरिकांनीही अशा उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे,असे आवाहन करण्यात आले आहे
