दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उल्लेखनीय कार्याची दखल
नाशिक दिनकर गायकवाड दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणारे विशेष शिक्षक उत्तम भाऊसाहेब आंधळे यांचा नाशिक येथे रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेपसिटी यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
विशेष शिक्षक केंद्र, इगतपुरी-१ इगतपुरी येथे कार्यरत असलेल्या उत्तम आंधळे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.त्यांच्या समावेशक शिक्षणाच्या कार्याची दखल घेत नॅशनल बिल्डर अवॉर्डने त्यांना सन्मानित करुन गौरविण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेपसिटीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हा गौरव करण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवून त्यांना शिक्षणाच्या आणि संधींच्या माध्यमातून सक्षम करण्याचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
“समावेशक शिक्षण हीच सकारात्मक बदलाची खरी गुरुकिल्ली आहे,” या विचारातून कार्य करणाऱ्या उत्तम आंधळे यांच्या सन्मानामुळे विशेष शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला निश्चितच नवी प्रेरणा मिळाली आहे.
