पुणे -प्रशांत निकम येथील ड्रीम फाऊंडेशन,सेवा फाऊंडेशन व डॉ. कलाम कौशल्य विकास केंद्र,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित पहिल्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय साहित्य संमेलनात अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट, पुणे येथील प्रा.बी.आर.घोडके यांना नुकतेच डॉ.कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार २०२६’ ने गौरविण्यात आले.
या संमेलनात त्यांना निमंत्रित कवी म्हणूनही आमंत्रित करण्यात आले होते.हा पुरस्कार खासदार बसवराज पाटील शेडम, डीआरडीओचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ.अशोक नगरकर, संमेलनाचे संयोजक तथा ड्रीम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी आणि सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रा.घोडके यांना हा पुरस्कार त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक,शैक्षणिक व पर्यावरणीय कार्याबद्दल देण्यात आला.त्यांनी पुण्यातील साहित्यिकांच्या घरोघरी जाऊन सुमारे १७५० पुस्तके जमा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक समृद्ध ग्रंथालय उभे केले आहे.ग्रामीण भागातील हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या मागास, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पुण्यामधील विविध नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये शिकण्याची संधी उपलब्ध करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास हातभार लावला आहे.
गेल्या काही वर्षांपासून निसर्ग संवर्धनाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत त्यांनी लोकसहभागातून हजारो झाडांचे वृक्षारोपण केले आहे. सध्या ते ग्रामीण भागातील जलसंधारणाच्या कार्यामध्येही मोलाचे योगदान देत आहेत.
कोविड-१९ च्या कठीण काळातही त्यांनी अनेक गरजू व होतकरू कुटुंबांना शिधा वाटप करून मदतीचा हात दिला होता.याशिवाय विद्यार्थी चळवळी आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनेक घटकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे.
या सर्व कार्याची दखल घेऊन ड्रीम फाऊंडेशनच्या वतीने त्यांना या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
