लोणी प्रतिनिधी पुणे येथील बालेवाडी येथे दि. २७ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी (एनएस सीसी) राहता पिस्तोल अँड रायफल शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या डी.के. स्पोर्ट्स क्लब, लोणी व राहता शाखेतील सहा खेळाडूंची निवड झाली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडू मध्ये वेदांत गौरव बोर्डे, कैवल्य अभिषेक शेजुळ, शिवांश महेश कोल्हे, पुष्कर रमेश आहेर, अभिनंदन कैलास कदम आणि उन्नती संजय वर्पे यांचा समावेश आहे.या खेळाडूंनी आपल्या सातत्यपूर्ण सराव, मेहनत, जिद्द आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळवले आहे.
या खेळाडूंना राहता पिस्तोल अँड रायफल शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे पदाधिकारी प्रा. सुशांत शेळके तसेच असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. दीपक रणपिसे, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक, एलबीटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेगाव दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण मिळाले आहे.
या यशाबद्दल असोसिएशनच्या वतीने सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार ॲड. गौरव बोर्डे, संस्थेचे विश्वस्त किरण रणपिसे, असोसिएशनचे सदस्य आकाश साबळे,गणेश , असोसिएशन मार्गदर्शक आशिष तिवारी तसेच राहता तालुक्यातील विविध क्रीडाप्रेमींनी खेळाडूंचे कौतुक करून त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राहता तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंनी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेपर्यंत मजल मारल्याने तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
