महापुरुषांच्या विचारांचा वारसा सामाजिक कार्यातून जोपासणारे प्रा.डॉ.सुनिल मतकर यांचे कार्य प्रेरणादायी
संगमनेर(नितीनचंद्र भालेराव)
प्राचीन काळी गुरुकुल पद्धतीत गुरूचे स्थान महत्त्वाचे असे, गुरुजन शिष्यांना सर्वांगसुंदर घडविण्या सोबतच गावांना दिशा देखील द्यायचे.असाच एक अवलिया आधुनिक काळात असून त्यानेही विद्यार्थी घडविण्यासोबत गावात आमूलाग्र बदल घडवून आणला.
हा अवलिया म्हणजे पाथर्डी तालुक्यातील मोहज
खुर्द या छोट्याशा गावातील शिक्षक प्रा.डॉ.सुनिल मतकर होय.मानव सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून "जगमित्र गुरुकुल"ची स्थापना करण्यात आली.आज या गुरुकुलामध्ये निवारा केंद्र,बालगृह,वृद्धाश्रम व्यायाम शाळा,व्यसनमुक्ती केंद्र, वाचनालय,लोककला जतन व संवर्धन प्रशिक्षण केंद्र असे विविध बहु उपयोग समाजकेंद्री, सामाजिक बांधिलकी जपणारे मानवतेचे मंदिर उभे केले आहे.
भारतीय घटनेचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर व शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या मार्गावर मार्गक्रमण करीत प्रा.डॉ.सुनिल मतकर यांच्या मानव सेवा प्रतिष्ठानची वाटचाल समाजाला नव प्रेरणा,
आदर्श व दिशा देणारी आहे.
वडील देविदास मतकर यांचे लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले.त्यामुळे गावातील शंकर दादा वांडेकर यांच्या कुटुंबाने त्यांचा सांभाळ केला,तसेच मोहज खुर्द या गावातील ज्येष्ठ नागरिकांचे मोठे सहकार्य मिळाले.देविदास मतकर व द्रौपद बाई यांना सुनिल,बाळासाहेब मुलगी राजकवर असे त्यांचे छोटेसे सुसंस्कारी मतकर कुटुंब होय.
मोहज खुर्द,तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर या गावात पावसाचे प्रमाण कमी असल्याने रोजगाराची संधी उपलब्ध नसल्याने सुनिल मतकर यांनी रोजगार हमी योजने मध्ये काम केले.रस्त्याच्या कामात खडी टाकणे, बंधाऱ्याचे काम,ओसाड माळ रानात बांध घालणे अशा प्रकारे मोलमजुरी व मेहनतीचे कष्टाचे काम करून शिक्षण घेतले.शिक्षण घेत असताना आलेल्या अडचणी वर मात करून एम.ए.मराठी पर्यंतचे शिक्षण वसतिगृहात राहून पूर्ण केले.
त्यानंतर सद्गुरु प्रसाद शिक्षण व संशोधन संस्था पंढरपूर संचलित श्री.संत तनपुरे बाबा विद्यालय खांडगाव तालुका, पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर येथे गेली २५ वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य करत आहे.संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.गुरुवर्य बद्रीनाथ तनपुरे महाराज यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी आपल्या भाषणामध्ये प्रा.डॉ.सुनिल मतकर यांचा "आम्हाला एक हिरा सापडलेला आहे "अशा शब्दात गौरव केला.
प्रा.डॉ.सुनिल मतकर यांनी मानव सेवा प्रतिष्ठान या संस्थेची सन २०१२ मध्ये स्थापना केली.या संस्थेच्या माध्यमातून सन २०१२ मध्ये श्रीराम बाल संस्कार केंद्र सुरू करण्यात आले.सन २०१४ मध्ये जय बजरंग व्यायाम शाळा शाळेची स्थापना करण्यात आली.मुलांना व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.सन २०१५ मध्ये निवारा केंद्र बालगृहाची मान्यता महिला व बालकल्याण विभागाकडून मिळाली.या निवारागृहामध्ये ४० ते ५० मुलं निवासी स्वरूपाचा लाभ घेत आहे.
सन २०१७ मध्ये प्रयोगात्मक लोककला सादरीकरणासाठी सांस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र शासन पुणे यांची मान्यता मिळाली.सध्या लोककला जतन संवर्धन प्रयोगात्मक सादरीकरण कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली जात आहे.
तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना वाढीव गुणांची सवलत मिळत आहे.सन २०२० मध्ये व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना.सन २०२० मध्ये वाचनालय पुस्तक पेढी (मानव सेवा सार्वजनिक वाचनालय) सुविधा विद्यार्थी व तरुणांसाठी उपलब्ध करून दिली.सदर वाचनालयाचा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना आणि गावातील विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे."जगमित्र गुरुकुलची" स्थापना सन २०२१ मध्ये करण्यात आली.या गुरुकुलामध्ये २०० पेक्षा अधिक स्थानिक गावातील व निवारा गृहातील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जगमित्र गुरुकुल मध्ये दर गुरुवारी व रविवारी मुलांसाठी विविध शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.प्रत्येक गुरुवारी सायंकाळी सहा वाजता तसेच दर रविवारी दिवसभर जगमित्र गुरुकुल मध्ये संस्कार वर्गाचे आयोजन करण्यात येते.जगमित्र गुरुकुल मध्ये नृत्य प्रशिक्षण,हरिपाठ,वाद्य श्लोक,वकृत्व कौशल्य,व्यक्तिमत्व विकास व विविध कला क्रीडा प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तर जगमित्र गुरुकुल मध्ये शैक्षणिक उपक्रमांसाठी सौ. अकोलकर- साठे मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन सहकार्य मिळत आहे.सन २०२४-२५ मध्ये कै. मालोजी मतकर वृद्धाश्रमाची स्थापना केली.
येथे २०-२५ वृद्धांना या अंतर्गत लाभ मिळत आहे.त्यामध्ये वृद्ध,जेष्ठ नागरिकांना निवासी व्यवस्था करण्यात आली आहे.सदर वृद्धाश्रमामध्ये वृद्ध व्यक्तींना राहण्यासाठी स्वतंत्र अशी निवासाची व्यवस्था केलेली आहे. पलंग,गादी,ब्लॅंकेट,कपडे,दोन वेळचे जेवण,चहा,नाश्ता अशाप्रकारे व्यवस्था संस्थेमार्फत करण्यात आली आहे.
वृद्धाश्रमामध्ये आजारी वृद्ध व्यक्तींना डॉ.अविनाश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार केले जातात.मानव सेवा प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलामध्ये तथा गुरुकुल मध्ये विविध सोयी सुविधा व उपक्रमाचे आयोजन केले जाते. या गुरुकुलामध्ये प्रशस्त असे सामाजिक हॉल,कॉम्प्युटर सेंटर, कार्यालय आहे.
बंदिस्त प्रेक्षा हॉल हा क्रीडा विभाग अहमदनगर यांच्याकडून मिळाला आहे.अशाप्रकारे अल्पावधीतच छोट्याशा रोपट्याचा मोठा वटवृक्ष झाला.या कामी प्रा.डॉ. सुनिल मतकर व त्यांच्या कुटुंबीयांचा मोठा सिंहाचा वाटा आहे.त्यांच्या या सामाजिक बांधिलकी जपणे,सामाजिक कार्याचा नावलौकिक मोहज खुर्द आणि पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण पाथर्डी तालुक्या बाहेर परराज्यात पोहोचला आहे. त्यांच्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंतरराज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
आज जगमित्र गुरुकुलचे कार्य शासनाच्या मदती विना चालू आहे.प्रा.डॉ.सुनील मतकर हे स्वतःच्या पगारातून पदरमोड करून,कर्ज काढून,वेळप्रसंगी पत्नीचे दागिने विकून अनाथ मुलांचा सांभाळ करतात,वृद्ध व्यक्तींना मदत करतात. स्वतःपुरते आयुष्य जगणाऱ्या कलयुगातील समाजाचे आत्मभान जागवून व नव प्रेरणा देणारे प्रा.डॉ.सुनील मतकर यांचे कार्य दिशादर्शक आहे.महात्मा ज्योतिराव फुले,भारतीय घटनेचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर व शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा चालविणारे प्रा. डॉ.सुनील मतकर यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
शब्दांकन नितीनचंद्र भालेराव
