नाशिक दिनकर गायकवाड घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरातून एक लॅपटॉप व दोन मोबाईल असा दीड लाखाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना अमृतधाम येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मयूर श्रीराम पाटील (वय १८, रा. नंदुरबार) हा व त्याचा मित्र सिद्धेश भाबड हे दोघे जण शिक्षणासाठी नाशिक येथे राहत असून, ते सध्या अमृत धाममधील मातोश्री नगर येथील एकनाथ टॉवरमध्ये भाडेतत्त्वावर राहतात. काल (दि. १०) सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घरात असलेला ४५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, २० हजार रुपये किमतीचा वन प्लस मोबाईल व ५० हजार रुपये किमतीचा ॲपल आयफोन असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार राजोळे करीत आहेत.