नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यात पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यामुळे शेती कामाना वेग आला होता. या विश्रांतीच्या कालावधी बळीराजाने शेतात सोयाबीन, मका,उडीद,मुंग तसेच भुईमूग चियाण्याची पेरणी करून घेतली आहे. सध्या खरीप हंगामातील टोमॅटो लागवडीला जोरदार सुरुवात झाली असून विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या तीन दिवसापासून पुन्हा सुरुवात केल्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ होताना दिसत आहे
दिंडोरी तालुक्यातील वाघाड धरण हे काल रात्री १०० टक्के भरले असून या धरणाच्या सांडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोलवण नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याप्रमाणे दिंडोरी
तालुक्यासह निफाड, येवला, नांदगाव (मनमाड) तालुक्यातील जनतेला बरदान ठरलेल्या करंजवण धरणातही मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा होत आहे. सध्या करंजवण धरणातील पाणीसाठा ६६.४७८ के झाला आहे. या धरणातून १०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग कादवा नदीत सोडण्यात आला आहे. त्याप्रमाणे दिंडोरीच्या पूर्वभागाची रक्तवाहिनी समजल्या जाणाऱ्या तीसगाव धरणाचा
पाणीसाठा ६२ टक्के वर पोहचला आहे. तसेच मांजरपाडा (देक्साने) प्रकल्पातून समाधानकारक पाणी येत असल्यामुळे तसेच पुणेगाव धरणात आजूबाजूच्या डोंगर दऱ्यांमधूनही मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत असल्यामुळे पुणेगाव धरणाचा पाणीसाठा ७४.४१ टक्के इतका झाला आहे. धरणामधून उनंदा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. याच उनंदा नदीचे पाणी ओझरखेड धरणात येत असल्यामुळे
तसेच स्थानिक पाणीही ओझरखेड धरणात जमा होत असल्यामुळे या धरणाचा पाणीसाठा ७३.४७ टक्के वर पोहचला आहे. त्याप्रमाणे गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून तालुक्यात पाऊस पडत असल्यामुळे सर्व नदी नाले प्रवाहीत झाले असून हे सर्व पाणी पालखेड धरणात जमा होत असल्यामुळे पालखेड धरणातून पाणी आवक लक्षात घेवून पाण्याचा विसर्ग केला जातो.
सध्या पालखेड धरणात ४४ टक्के इतका पाणी साठा असून या धरणाच्या डाव्या कालव्यातून ४०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग चालू असून अंदाज पाहून पाण्याचा विसर्ग कमी जास्त केला जात आहे.सध्या दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर वाढत असून धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली असून वाघाड धरण हे १०० टक्के भरले असून सांडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे.
त्यामुळे हे सर्व पाणी पालखेड धरणात जमा होणार असल्यामुळे पालखेड धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कावा, उनंदा, कोलवण नदी काठावरील गावांनी सतर्क रहावे असे आव्हान दिंडोरी - पेठचे उपविभागीय अधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे, दिंडोरीचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले आहे.
