नाशिक दिनकर गायकवाड आनंदवल्ली शिवारातील नवश्या गणपतीजवळ एका बंगल्यात घरफोडी करून अज्ञात चोरट्याने २३ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी संजय वाल्मीकराव आहेर (वय ५८, रा. पाईपलाईन रोड, आनंदवल्ली) यांच्या मातोश्री नवश्या गणपतीजवळील स्वप्नकमल बंगल्यात एकट्या राहतात. त्या दि. २७ जून रोजी आपल्या मुलीकडे बाहेरगावी गेल्या होत्या. त्यावेळी त्या बंगल्याच्या बाहेरील वॉचमनही बाहेरगावी गेला होता. दरम्यानच्या काळात संजय आहेर यांनी
घराजवळ चक्कर मारली असता त्यांना घराचे लॉक तोडलेले दिसले.त्यांनी त्वरित आईशी संपर्क साधून विचारणा केली असता त्या बाहेरगावीच होत्या, असे समजले. घरफोडी झाल्याचे लक्षात येताच आहेर यांनी याबाबत गंगापूर पोलिसांना माहिती दिली.ही घरफोडी दि. २७ जून रोजी सायंकाळी ७.३० ते ३० जून रोजी सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान घडली. चोरट्याने घराचा फोल्डिंगचा दरवाजा कशाने तरी तोडून घरात प्रवेश केला. त्याने बेडरूममधील लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले १ लाख ४० हजार रुपये रोख, पाच ग्रॅम वजनाचे अडीच हजार रुपये किमतीचे अमेरिकन डायमंडचे कानातील
सोन्याचे टॉप्स, अडीच हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स, अडीच हजार रुपये किमतीचे मंगळसूत्राच्या वाट्या असलेले पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स, पाच हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे मोती असलेले सोन्याचे टॉप्स, तीन हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल, असा एकूण १ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. आहेर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पाटील करीत आहेत.
