नाशिक दिनकर गायकवाड खासदार राजाभाऊ वाजे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांची दिल्लीत भेट घेऊन ओझर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासह हवाई संपर्क विस्ताराच्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली.आगामी २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही प्रदीर्घ बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
या बैठकीत नाशिक-दिल्ली दररोजची थांबवलेली फ्लाइट सेवा पुन्हा सुरू करणे,ओझर विमानतळाचा टर्मिनल विस्तार, नव्या धावपट्टीचे काम, कुंभमेळ्याच्या तयारीसाठी हेलिपॅड्सची गरज आणि नव्या हवाई मार्गांची मागणी अशा विविध बाबी मंत्र्यांसमोर ठामपणे मांडण्यात आल्या.सध्या आठवड्यात फक्त तीनच दिवस सुरु असलेल्या दिल्ली-नाशिक फ्लाइटमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही सेवा पूर्वीप्रमाणे दररोज सुरू झाल्यास,नाशिकच्या व्यापारी, वैद्यकीय शैक्षणिक आणि धार्मिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल,असे वाजे यांनी स्पष्ट केले.
ओझर विमानतळावर एकाचवेळी १००० प्रवाशांची क्षमता असणारा नविन टर्मिनल उभारणे,टॅक्सी वे व नविन विमानतळ अप्रोच विकसित करणे, तसेच अधिक विमानतळ पार्किंग स्पेसची निर्मिती करणे या सगळ्या प्रस्तावांना केंद्र सरकारच्या सहकार्याची आवश्यकता आहे. यासोबतच, त्र्यंबकेश्वर, नाशिक शहर आणि ओझर येथे स्वतंत्र हेलिपॅड्सची उभारणी केली जावी, अशी विनंतीही त्यांनी केली. कुंभमेळ्याच्या वेळी अतिविशाल भाविक संख्येचा विचार करता, ही यंत्रणा आपत्कालीन व प्रशासकीय कारणांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. खा.वाजे यांनी ओझर विमानतळाचे नामकरण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावावर करण्याची मागणी केली. त्यांनी नाशिकमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची स्थापना करून या भागाला औद्योगिक, संरक्षण आणि हवाई दृष्टीने सक्षम केले, याची आठवण त्यांनी मंत्री महोदयांना करून दिली.
नाशिकहून कोलकाता, चेन्नई, नागपूर, पुणे, कोल्हापूर आणि वाराणसीसारख्या महत्त्वाच्या शहरांशी हवाई संपर्क स्थापन करण्याची
भविष्यात मुंबईला पर्याय म्हणून ओझर विमानतळ समृद्धीस यावे.
हवाई वाहतूक सेवा ज्याठिकाणी चांगली असते त्या भागाच्या विकासाला महत्वपूर्ण इंजिन जोडले जाऊन विकासाची गती अधिक वाढते. त्यामुळे ओझर विमानतळ अधिकाधिक समृद्ध कसे होईल, याकडे माझे लक्ष आहे. मंत्री नायडू यांना ओझर विमानतळाबाबतच्या अनेक प्रश्नबाबत सज्ञान करून त्याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली आहे. तब्बल १० विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली आहे. भविष्यात मुंबईला पर्याय म्हणून ओझर विमानतळ समृद्धीस यावे, असा माझा मानस आहे आणि औद्योगिक चेहरा अधिक उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
- खासदार राजाभाऊ वाजे, नाशिक लोकसभा
गरजही त्यांनी मांडली. यामुळे पर्यटन, व्यापार, शिक्षण व वैद्यकीय सेवांमध्ये नाशिकचा सहभाग वाढेल. तसेच, दिल्ली-नाशिक सायंकाळी थेट फ्लाइट सुरु होण्यासाठी दिल्ली विमानतळावर रात्रीच्या स्लॉट मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याची मागणीही त्यांनी केली.एचएएल
नाशिकमध्ये उभारण्यात आलेल्या नवीन युनिटसाठी देशांतर्गत कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक पावले उचलावीत, अशी विनंती करताना, 'मेक इन इंडिया' मोहिमेला चालना मिळेल, असे ते म्हणाले. यासोबतच, एचएएल कडून उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीच्या इमिग्रेशन सुविधांचे लवकरात लवकर संचालन सुरू करावे, ही मागणीही त्यांनी केली. या बैठकीत मंत्री राममोहन नायडू यांनी अनेक मुद्यांवर सकारात्मकता दर्शवून प्रस्तावांचा सखोल विचार करण्याचे आश्वासन दिले. केंद्र आणि राज्य सरकार तसेच एचएएल व इतर संबधित संस्थांमध्ये समन्वय साधून प्रस्तावित प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यावर दोघांनी एकमत दर्शवले. खा. वाजे यांच्या या पुढाकारामुळे नाशिकच्या हवाई विकासाला निश्चितच नवे गतीशील वळण मिळेल. कुंभमेळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रणा सशक्त होतील. या विषयांवर झाली प्रदीर्घ चर्चा- खा. वाजे यांनी मंत्री नायडू यांच्याकडे ओझर विमानतळाच्या विकासासाठी पुढील प्रस्ताव मांडलेः नाशिक-दिल्ली दररोजच्या फ्लाइटची पुनर्स्थापना, ह्न सध्या आठवड्यातून फक्त तीन दिवस चालणारी इंडिगोची फ्लाइट पूर्वीप्रमाणे दररोज सुरु करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. ही सेवा व्यापारी, वैद्यकीय, विद्यार्थी व भाविकांसाठी उपयुक्त आहे, ओझर विमानतळावर धावपट्टीचे विस्तारीकरण, टर्मिनल वाढ व हेलिपॅड्सची स्थापना, ह्र २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, विमानतळाची क्षमता वाढवणे आवश्यक आहे, हवाई उड्डाणांसाठी नव्या मार्गांची गरज नाशिकहून कोलकाता, चेन्नई, पुणे, नागपूर, वाराणसी, कोल्हापूर आदी शहरांसाठी नियमित उड्डाणे सुरु करण्याची मागणी, ओझर विमानतळाचे नामकरण 'यशवंतराव चव्हाण आंतरराष्ट्रीय विमानतळ, नाशिक' असे करण्याची विनंती खासदार वाजे यांनी केली.