धाराशिव सिटीलाईन न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील परांडा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या करंजा गावातील शिंदे व करळे वस्तीतील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी तेथील परिस्थिती जाणून घेतली.
मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आल्याने स्थानिक वाड्या वस्त्यांचे अतोनात नुकसान झाले असून,अनेक घरे माती-चिखलाने भरून गेली आहेत.यावेळी श्री.शिंदे यांनी ग्रामस्थांची व्यथा जाणून घेऊन सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असे सांगून ग्रामस्थांना धीर दिला.
नदी पात्रात असलेल्या वाडीतील काही घरे अद्यापही पाण्याखाली असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ बोटीने नदीपात्रात जाऊन या वाडीला भेट देऊन पाहणी केली. त्याचबरोबर या वाडीवरील नागरिकांचे तात्काळ पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.सरकारी निकष बाजूला ठेऊन सरकार नुकसान भरपाईसाठी नक्की मदत करेल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.तसेच यावेळी शिवसेनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही करण्यात आले.
