आठ जण पोलिसांच्या ताब्यात
नाशिक दिनकर गायकवाड कमी दराच्या नोटा देऊन त्या बदल्यात जास्त दराच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून मनमाडच्या मेडिकल व्यावसायिकासह त्यांच्या सहकाऱ्याकडून ३० लाख रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रकाश लोंढे व नाना लोंढे यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी प्रकाश लोंढे, नाना लोंढे, केतन भुजबळ, रूपेश पवार, गौरव देशमुख, प्रशांत धनेधर व इतर तीन ते चार अनोळखी इसम हे फिर्यादी विनोद सुकलाल मुनोत (रा. तेली गल्ली, मनमाड) यांच्या मेडिकल दुकानात आले. प्रकाश लोंढे यांना निवडणुकीसाठी पैसे वाटप
करावयाचे आहेत.त्यासाठी त्यांना कमी दराच्या नोटा पाहिजे आहेत. त्याऐवजी ते जास्त दराच्या नोटा देणार आहेत, तसेच त्या मोबदल्यात ते मूळ रकमेच्या दहा टक्के रक्कम जास्त देणार आहेत, असे आमिष दाखवून मुनोत यांची फसवणूक केली. दि. २१ एप्रिल २०१९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास केतन भुजबळ याच्या
एमएच १५ एफएन १२३७ या क्रमांकाच्या कारने फिर्यादी व त्यांचे सहकारी सातपूर एमआयडीसीतून जात होते. त्यावेळी आरोपी प्रकाश लोंढे याने केतन भुजबळ यास कॉल केला.
लोंढे याने सांगितल्याप्रमाणे केतन भुजबळ याने त्याच्या कमरेला लावलेला पिस्तुलासारखा गावठी कट्टा काढून फिर्यादी मुनोत
यांच्या कानाला लावून त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली, तसेच रूपेश पवार याने त्याच्याकडील चाकूसारखे हत्यार मुनोत यांचे सहकारी योगेश जाधव यास दाखवून त्यालासुद्धा धमकी देऊन दहशतीने फिर्यादी व योगेश जाधव यांना धक्काबुक्की व मारहाण करून मुनोत यांच्या हातातील ३० लाख रुपये असलेली पिशवी केतन भुजबळ याने जबरदस्तीने हिसकावून घेतली, तसेच आरोपी गौरव देशमुख याने फिर्यादी व योगेश जाधव यांचे मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेत त्यांना शिवीगाळ, मारहाण व धक्काबुक्की
केली. त्यानंतर आरोपी केतन भुजबळ व रूपेश पवार यांनी कारच्या दोन्ही बाजूंचे दरवाजे उघडून धक्का देऊन फिर्यादी मुनोत व योगेश जाधव यांना चालत्या गाडीतून लाथ मारून ढकलून देत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, तसेच प्रकाश लोंढे याचा नाना लोंढे याने फिर्यादी मुनोत यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात प्रकाश लोंढे व नाना लोंढे या पितापुत्रासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बटुळे करीत आहेत.
