पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील बारामती हॉस्टेल या ठिकाणी बैठका,मुलाखती घेत आहेत. मात्र त्यांच्याशी संपर्क करणाऱ्यांना त्यांचा फोन नॉट रिचेबल लागत आहे.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार,अजित पवार कुठे गेले होते,त्यांचे लोकेशन सापडले आहे.बारामती हॉस्टेल मधून अजित पवार ज्या कारने बाहेर पडले होते,ती कार अजित पवारांच्या शिवाजीनगर येथील जिजाई निवासस्थान बाहेर असल्याचे दिसून आले.अजित पवार पोलीस ताफा न घेता जिजाई निवासस्थानी का गेले? इथं ते कुणाला भेटायला आले? अजित पवारांच्या आधीच जिजाई निवासस्थानी कुणी आलेय का ?अशा विविध चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणावरून शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांची गाडी बाहेर पडली.
पुण्यातील युती फिस्कटल्यानंतर आता पिंपरी चिंचवडमधील युतीबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार आणि कोल्हे एकत्र आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नुकतेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीची चर्चा फिस्कटली असल्याची माहिती समोर आली आहे.
कारण अजित पवारांनी शरद पवारांच्या पक्षाला अवघ्या तीस ते पस्तीस जागा देऊ केल्या आणि घड्याळ या चिन्हावर लढण्याची अट घातली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाचे अंकुश काकडे आणि विशाल तांबे हे नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर होते. त्यामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहे.मात्र अद्याप कोणताही ठाम निर्णय झालेला नाही.
