राहाता प्रतिनिधी पिस्तुलाचा धाक दाखवुन जिवे ठार मारण्याची धमकी देणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख नुकताच स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर कडुन जेरबंद करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की की नुकतेच फिर्यादी दिपक किसन जाधव रा. लक्ष्मीनगर, गल्ली नं. ३, शिर्डी,ता.राहाता हे त्यांचा मुलगा निलेश असे शिर्डी येथुन सावळीविहीर येथे जात असतांना पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख व त्याचे इतर साथीदार अशांनी फिर्यादीचे मुलास अडवुन त्यांना पिस्तुल दाखवुन,शिवीगाळ व दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे.
या घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. ९६४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९ (२),१९१ (२)(३), १९०, ३५१ (२), ३५२, १२६ सह आर्म ॲक्ट कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,यांनी स्थानिक गुन्हे शाखेस या गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढुन त्यांना ताब्यात घेणेबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.
या सुचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक किरण कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दिपक मेढे,पोलीस अंमलदार फुरकान शेख, विजय पवार,राहुल द्वारके,राहुल डोके, भिमराज खर्से, सतिष भवर, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव तसेच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सागर काळे यांचे पथक तयार करुन या पथकास आरोपींची माहिती काढुन आरोपींस ताब्यात घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले होते.
गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत असतांना पथकास या गुन्ह्यातील आरोपी नामे पाप्या शेख हा शिर्डी परिसरातील फायबर कारखान्याचे जवळ असलेल्या हॉटेल रेणुकाचे पाठीमागील बाजुचे काटवनामध्ये बसलेले असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पथकाने तात्काळ माहितीतील ठिकाणी जावुन खात्री करता या ठिकाणी एक संशयीत इसम दिसुन आला.
हे पथक त्याचेकडे जात असतांना तो पथकास पाहुन पळुन जावु लागल्याने पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेण्यात आले असुन त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव १) पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख वय ४५ वर्षे, रा. कालीकानगर, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले आहे.
ताब्यातील आरोपीस शिर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८६४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९ (२), १९१(२)(३), १९०,३५१ (२), ३५२, १२६ सह आर्म ॲक्ट कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी शिर्डी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास शिर्डी पोलीस ठाणे करीत आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
