नाशिक दिनकर गायकवाड नोकरीचे बनावट आदेश पाठवून त्यापोटी साडेदहा हजार रुपये घेऊन एका मुलीची फसवणूक केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,की फिर्यादी अनंत विलास कुलकर्णी (रा. माधवबाग अपार्टमेंट, स्वामी विवेकानंदनगर, म्हसरूळ) यांच्या मुलीला तिच्या मोबाईल क्रमांकावर आरोपी अभिनव प्रकाश राऊत या व्यक्तीने प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, नाशिक येथे लॅब टेक्निशियन (फॉरेन्सिक) या पदावर नेमणूक झाल्याचे नोकरीचे बनावट आदेश पाठविले.
या नियुक्ती आदेशावर महाराष्ट्र शासन, गृह विभाग, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचे लेटरहेड वापरून त्यावर संचालकांची स्वाक्षरी आणि सीलचा दुरुपयोग केला, तसेच फिर्यादीच्या मुलीकडून १० हजार ३३२ रुपये ऑनलाईन स्वीकारून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अभिनव राऊत याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
