आश्वी संजय गायकवाड राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडाला असताना
संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागाला शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.रात्रभर कोसळणाऱ्या या पावसाने आश्वी पंचक्रोशीत अक्षरशःकहर माजवला असून,अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत,प्रवरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. या अस्मानी संकटाने ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संकटात सापडले आहेत.
गावागावात पावसाचा तडाखा आश्वी खुर्द,आश्वी बुद्रुक,उंबरी, ओझर बु॥,शेडगाव, दाढ खुर्द, दाढ बुद्रुक, निमगाव जाळी, प्रतापपूर, खळी, कांगणवाडी, झरेकाठी,चनेगाव, पिंप्री लौकी, अजामपूर, पिंप्री फाटा, औरंगपूर, सादतपुर, रहीमपूर, मनोली, शिबलापूर,
पानोडी, माळेवाडी, कनोली, कणकापूर, हंगेवाडी आणि मालुंजा ओझर खु॥ या गावांमध्ये पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. आश्वी खुर्द मध्ये देशवंडीकर वाडीची भिंत कोसळली तर प्रिंप्री लौंकी अजमपूर येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले चणेगाव येथील तुकाराम कारभारी खेमनर यांची विहीर ओसंडून वाहत आहे,
चिमाजी रखमाजी शेळके यांच्या दोन एकर कपाशी,घास शेतीसह इतरांची शेती अक्षरशःजलमय झाली त्यांच्या शेतीतून पाणी ओसंडून वाहत आहे आहे अनेक घरांमध्ये व गोठ्यांमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांना आपली जनावरे वाचवण्यासाठी रात्रभर जागून काढावी लागली.
रस्ते वाहून गेले,संपर्क खंडित मुसळधार पावसामुळे ओढे-नाले इतके भरले आहेत की अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी तर रस्त्यांचे मोठे तुकडे पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले आहेत. यामुळे गावागावातील संपर्क पूर्णपणे खंडित झाला असून,ग्रामस्थ अडचणीत सापडले आहेत सर्वाची त्रेधातिरपीट झाली आहे.शासकिय पथके पंचनाम्यासाठी दाखल झाले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या हंगामात मोठ्या कष्टाने उभी केलेली मका,सोयाबीन, भाजीपाला तसेच इतर खरीप पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
गेल्या १८ तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या पावसामुळे प्रवरा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढत आहे
ग्रामस्थांची प्रशासनाकडे मदतीची मागणी
या भीषण परिस्थितीत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
विज खंडित न झाल्याने दिलासा
आश्वी विज केंद्रात गेल्या दोन-तीन दिवसांत अनेक देखभालीची कामे झाल्यामुळे रात्रभर सुरू असलेल्या पावसात वीज खंडित झाली नाही.त्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून,त्यांनी वीज कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
