आरोग्य सेवेसाठी आशा वर्कर्स यांचे योगदान अमूल्य

Cityline Media
0
ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे प्रतिपादन 

ठाणे विशाल सावंत तळागाळात जाऊन वर्षानुवर्षे लोकसेवा आणि रुग्णसेवा बजावणाऱ्या आशा वर्कर्स या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत, त्यांचे योगदान हे अमूल्य असल्याचे वक्तव्य महापौर शर्मिला पिंपळोलकर येथे केले.
नुकतेच ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे  विशेष सन्मान करण्यात आला. संशयित क्षयरुग्णांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करताना अपेक्षेपेक्षा अधिक कामगिरी करणाऱ्या प्रतिनिधीक स्वरुपात वीस  आशा वर्कर्संना महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

ठाणे महानगरपालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांसह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधत, आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहन देत आणि आजारांबाबत जनजागृती करत आशा वर्कर्स आरोग्य यंत्रणेचा भक्कम आधारस्तंभ ठरत आहेत. संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांची नोंदणी करणे ही अत्यंत जबाबदारीची भूमिका त्यांनी प्रभावीपणे पार पाडली आहे. अनेक आशा वर्कर्सनी निर्धारित उद्दिष्टांपेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी करून आपली कर्तव्यनिष्ठा सिद्ध केली असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले. तर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी देखील आशा वर्कर्सच्या कामाचे कौतुक करीत ठाणे महापालिका त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

तर प्रास्ताविकपर भाषणात मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी आशा वर्कर्सच्या कामाचे कौतुक केले. संशय‍ित क्षयरुग्णाच्या नोंदणी  कामात आशांनी सक्रिय सहभागी घेतला. तसेच  दहा दिवसांत १५० जणांची नोंदणी करण्याचे उद्द‍िष्ट दिले असताना हजारहून अधिक संशयित रुग्णांची नोंदणी त्यांनी केली, त्यामुळेच त्यांचा सन्मान करण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले.

-महानगर गॅस लि.कडून रु.१.२५ कोटींचा निधी
महानगर गॅस लिमिटेड यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासाठी १.२५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दोन अ‍ॅडव्हान्स सोनोग्राफी मशीन आणि एक वीस इको मशीन उपलब्ध करण्यात आली आहे.

या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. रेडिओलॉजी विभागाचे बळकटीकरण करण्यासाठी या मशीन महत्त्वपूर्ण ठरणार असून विशेषतःआर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. अत्याधुनिक तपासण्या स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत.

‘हिंद दी चादर’ शहीदी समागम शताब्दीनिमित्त फलकाचे अनावरण
यावेळी ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे शीख धर्मातील नववे गुरु गुरूतेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी निमित्तच्या कार्यक्रमाच्या फलकाचे अनावरणही महापौरांच्या हस्ते करण्यात आले. गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवतेच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे.या शताब्दी वर्षानिमित्त आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व आरोग्य केंद्रात आरोग्‌य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी नमूद केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!