संगमनेर तालुक्यातील खळी येथे वृक्षारोपण करून रक्षा विसर्जनाची अनोखी परंपरा
संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील खळी गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व,तसेच मा. महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचे विश्वासू सहकारी, राजहंस दूध संघाचे विद्यमान उपाध्यक्ष व खळी गावचे उपसरपंच राजेंद्र नामदेव चकोर व सुधीर नामदेव चकोर यांचे वडील दिवंगत नामदेव धोंडीबा चकोर यांचे नुकतेच वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
दिवंगत नामदेव चकोर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीने रक्षा नदीमध्ये विसर्जित न करता पर्यावरण संवर्धनाचा एक अनोखा आणि अनुकरणीय आदर्श समाजासमोर ठेवला. घरासमोर सुंदर वृक्षारोपण करून त्या वृक्षाच्या मुळाशी रक्षा ठेवण्यात आली.या माध्यमातून आपल्या पूर्वजांच्या स्मृती जपत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश चकोर परिवाराने दिला.
“रक्षेचे नदीत विसर्जन करण्याऐवजी वृक्षाच्या रूपाने आपल्या वडिलांच्या स्मृती जतन करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे,” अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.चकोर परिवाराने सुरू केलेला हा उपक्रम समाजातील इतर नागरिकांसाठीही प्रेरणादायी असून, अंत्यसंस्कारानंतरच्या प्रथांमध्ये पर्यावरणपूरक विचार करण्याची गरज यातून अधोरेखित झाली.
यावेळी चंद्रभान तांबे, सुरेश नागरे, प्रा.बाळासाहेब वाघमारे ,तुकाराम घुगे, भानुदास उगलमुगले, भाऊसाहेब नागरे, सूर्यभान सानप, बाळासाहेब आव्हाड, दिलीप घुगे,सोन्याबापू लबडे,छबू उगलमुगले, वेणुनाथ सानप,पांडू घुगे यांच्यासह चकोर परिवारातील सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
वडिलांच्या स्मृतींचे वृक्षरूपाने जतन करून चकोर परिवाराने “एक व्यक्ती–एक वृक्ष” आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश दिला आहे.त्यांच्या या उपक्रमाचा इतरांनीही आदर्श घ्यावा,अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
