लोणी रुपाली भालेराव साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा सण उद्या सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर आज राहाता लोणी येथील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.ग्रामीण भागात अक्षय तृतीयेला पितृपूजनाचे आणि दानाचे विशेष महत्त्व असल्याने, पूजेसाठी लागणाऱ्या मातीच्या माठ आणि गाडग्यांच्या खरेदीला विशेष पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून आले.
उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असतानाच सण आल्याने बाजारात पाण्याचे माठ,डेरे आणि सुगडी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत. मातीच्या वस्तूंच्या दुकानावर सकाळपासूनच ग्राहकांनी रांगा लावल्या होत्या. पारंपारिक पद्धतीने पितरांचे पूजन करण्यासाठी लागणारी मातीची भांडी खरेदी करण्याकडे ग्रामीण भागातील जनतेचा अधिक कल दिसून आला.
विक्रेत्यांनी देखील ग्राहकांची मागणी लक्षात घेता विविध आकाराचे आणि नक्षीकामाचे माठ उपलब्ध केले आहेत.
केवळ मातीची करा आणि केळी नव्हे, तर फळबाजार देखील आज ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेला होता. सणाच्या नैवेद्यासाठी आणि पाहुणचारासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या फळांची आवक वाढली आहे.यात प्रामुख्याने रसाळ आंब्यांची मोठी मागणी पाहायला मिळाली.
अक्षय तृतीयेला आंब्याचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा असल्याने आंबा खरेदीसाठी मोठी लगबग सुरू होती. यासोबतच कलिंगड आणि खरबूज आणि इतर मोसमी फळांचीही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.
बाजारपेठेतील या मुख्य भागासह कपडे आणि दागिन्यांच्या दुकानांमध्येही सकाळपासूनच चैतन्य पसरले होते. नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी अक्षय तृतीयेचा मुहूर्त शुभ मानला जातो, त्यामुळे अनेक नागरिकांनी आपली खरेदी आजच पूर्ण करण्यावर भर दिला.
वाहनांच्या वर्दळीमुळे आणि खरेदीदारांच्या गर्दीमुळे बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला होता, मात्र सणाच्या उत्साहापुढे हे किरकोळ अडथळे भाविकांना जाणवले नाहीत. एकंदरीत, उद्याच्या अक्षय तृतीयेच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसर सज्ज झाला असून बाजारपेठेत बरीच उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
