हनुमंतगाव संदिप गावडे जिद्द,सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवत संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील कु. सृष्टी भास्कर गावडे यांची अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये परिचारिका ऑफिसर पदासाठी निवड झाली असून, प्रतिष्ठेच्या परिचारिका अधिकारी भरती सामायिक पात्रता चाचणी १० परीक्षेत त्यांनी देशभरात ६१ वा क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या त्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिल्या विद्यार्थिनी ठरल्या आहेत.
केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्थांपैकी एक असलेल्या मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. एप्रिल महिन्यात दोन टप्प्यांत पार पडलेल्या परीक्षेसाठी देशभरातून तब्बल ९२ हजार २६ विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी केवळ १४ हजार ५२७ विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरले होते. देशभरातील विविध एम्स रुग्णालयांतील नर्सिंग ऑफिसर पदाच्या २ हजार ७७९ जागांसाठी ही स्पर्धा होती.
पहिल्या टप्प्यात पात्रता गुण मिळवणे आवश्यक असताना अंतिम निवडीसाठी दुसऱ्या टप्प्यात उच्च गुणांची आवश्यकता होती.अशा अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत कु.सृष्टी गावडे यांनी दुसऱ्या टप्प्यात तब्बल ८० टक्के गुण संपादन करत राष्ट्रीय स्तरावर ६१ वा क्रमांक मिळवला. ग्रामीण पार्श्वभूमी, मर्यादित साधने आणि स्पर्धेचे मोठे आव्हान यांवर मात करत त्यांनी मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात आहे.
शिस्तबद्ध अभ्यास, योग्य नियोजन, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे सृष्टी गावडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. वैद्यकीय व नर्सिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे यश प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय स्तरावर यश मिळवता येते, याचा प्रत्यय त्यांच्या कामगिरीतून आला आहे.
कु. सृष्टी या भास्कर संपत गावडे यांच्या कन्या असून त्यांच्या यशाबद्दल जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणीचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, सौ. सुवर्णा विखे , सौ. शालिनी विखे , डॉ.सुजय विखे , ध्रुव विखे , प्रवरा बँकेचे मा. संचालक किसन कोतकर, प्रवरा कारखान्याचे संचालक अशोक घोलप, ज्ञानदीप वाचनालय हनुमंतगाव, सरपंच, उपसरपंच तसेच समस्त ग्रामस्थ, शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कुटुंबीयांनी या यशाचे श्रेय सृष्टी यांच्या अथक परिश्रमाला, शिक्षकांच्या मार्गदर्शनाला आणि कुटुंबाच्या पाठिंब्याला दिले. एम्ससारख्या देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्थेत निवड झाल्याने हनुमंतगावसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
