संगमनेर उपनिबंधकांचा दणका!
झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेरच्या सहकार क्षेत्रात मोठा खळबळ उडवणारा निर्णय उपनिबंधक,सहकारी संस्था संगमनेर यांनी दिला असून पिंपळे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षासह एका संचालकांचा तीन अपत्य नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अपात्र ठरविण्यात आले आहे. या निर्णयामुळे संस्थेच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७३ क अ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.तालुक्यातील पिंपळे येथील तक्रारदार राहुल राजेंद्र भोजने यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली होती.संबंधित संचालकांना नोटिसा बजावून त्यांचे म्हणणेही ऐकून घेण्यात आले.मात्र सादर करण्यात आलेल्या अधिकृत जन्म दाखल्यांमधून आरोप स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत निर्णायक आदेश पारित केला.
संस्थेचे अध्यक्ष शिवनाथ निवृत्ती कोटकर व संचालक अण्णासाहेब शिवराम ढोणे यांना तीन अपत्य असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना संचालक पदासाठी अपात्र घोषित करण्यात आले. काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे ते समर्थक असुन बी.आर चकोर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोसायटी पॅनल निवडुन आला होता मात्र निवडणूक आयोगाची दिशाभूल करत खोटी स्वंयघोषणापत्र सादर करुण फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे.सर्व पुराव्यांची खातरजमा करून त्यांच्या जागा तत्काळ रिक्त झाल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात मोठी राजकीय चर्चा रंगली असून अनेक संस्थांमधील संचालकांचे धाबे दणाणले आहेत. “नियम सर्वांसाठी समान” असा संदेश सहकार प्रशासनाने या निर्णयातून दिल्याची चर्चा सुरू आहे.विशेष म्हणजे आगामी काळात अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात असून काही संस्थांमधील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
दरम्यान,या निर्णयामुळे पिंपळे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या सत्तासमीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संस्थेतील आगामी राजकीय घडामोडींना आता वेग येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.अपात्र संचालकांवर आणखी काही गुन्हे दाखल होताय का याकडे लक्ष लागले आहे.
