कला,साहित्य पत्रकारिता समाजसेवेतील कर्तुत्ववानांचा अभिनेत्री निशिगंधा वाडांच्या हस्ते गौरव
सोनगाव प्रतिनिधी कला, साहित्य,पत्रकारिता, समाजसेवा,सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा राज्यस्तरीय ‘सौंदर्य कलावती पुरस्कार २०२६’ सोहळा नुकताच श्रीरामपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात पार पडला. श्रीरामपूर येथील विनोद वाघमारे,राधाकिसन वाघमारे सुनिल पाटील,तसेच स्नेहमाला फाउंडेशन आयोजित सोहळ्यास राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.
मराठी चित्रपट व दूरदर्शन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढली. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
समाजातील सकारात्मक कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
त्यानंतर रिदम परिवाराच्या वतीने अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात त्यांनी कला, संस्कृती आणि सामाजिक कार्याचा गौरव करत अशा उपक्रमांमुळे समाजातील गुणी व्यक्तींना प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.
सोहळ्यात महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय नृत्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. गणेश वंदना, लावणी,फ्यूजन सॉंग तसेच झुंबा ग्रुपच्या महिलांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत आणली.
यावेळी प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट निलेश यादव यांनी महिलांसाठी विविध आधुनिक हेअरकट प्रकारांची माहिती देत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. त्यांच्या सादरीकरणाला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विनोद वाघमारे, राधाकिसन वाघमारे, सुनील पाटील तसेच स्नेहमाला फाउंडेशन यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला नगरसेविका नवनीतकौर लकी सेठी, रणजित पाटील,शंकर सोनावणे, शहाजी दिघे, प्रणिती चव्हाण, वैशाली पोटे, वैशाली कोते,डॉ. शीतल घोगरे, पुष्पा पाटील, समाजसेविका पार्वतीताई वाघमारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यास राष्ट्रसह्याद्री,सिटीलाईन न्यूज, दैनिक भूगोल, अहिल्यानगर मराठी न्यूज आणि साई समर्थ प्रवरा न्यूज यांनी मीडिया पार्टनर म्हणून सहकार्य केले.संबंधित वृत्तसंस्थांचे संपादक आणि पत्रकार यांचीही यावेळी उपस्थिती होती.
कला, साहित्य, पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत समाजातील प्रेरणादायी व्यक्तींना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा पुरस्कार सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.
