जि.प.शाळेला महंत एकनाथ महाराजां कडून एकावन्न हजारांची मदत
संगमनेर नितीनचंद्र भालेराव तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील जिल्हा परिषद शाळेत नवीन शैक्षणिक वर्षा निमित्ताने शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून,पुष्पगुच्छ देऊन व ढोल,ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
प्रसंगी आकर्षक सजावट केलेल्या ट्रॅक्टर मधून नवागत विद्यार्थ्यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.ट्रॅक्टरवरून निघालेल्या अनोख्या मिरवणुकीमध्ये विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.यावेळी ओजस्वी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महंत एकनाथ महाराज यांनी जिल्हा परिषद शाळेला एकावन्न हजारांची भरघोस मदत केली. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मा. मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महंत एकनाथ महाराज म्हणाले देशाला युद्धाची नव्हे बुद्धाची गरज आहे. देशाला बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची गरज आहे.देश आणि धर्म वाचवायचा असेल तर बुद्धांचे विचार महत्त्वाचे आहे. बुद्ध समजला तर अज्ञान आणि अंधश्रद्धेवर विजय मिळवता येईल.ज्ञानाची ज्योत दाखवण्याचे कार्य बुद्धांनी केले आहे.
शाळेत येणे म्हणजे अक्षर ओळख,अंकांची ओळख म्हणजे ज्ञान घेणे होय.थोडे मोठे होऊन ग्यान भेटते आणि भेटलेल्या ज्ञानाचे चिंतन करून विज्ञान भेटते.विज्ञान म्हणजे सत्याचे ओळख सत्य ओळखण्यासाठी विज्ञानाची गरज आहे.आणि विज्ञानवादी विचार बुद्धांनी या जगाला दिले आहे.शाळेत शिक्षकांनी गाडगे महाराज,सावित्रीबाई फुले,ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती दिली पाहिजे.
विद्यार्थी घडवण्यासाठी समाज सुधारकांच्या विचार महत्त्वाचे आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पाठवावे,अभ्यासाकडे लक्ष द्यावे,अभ्यास करून घ्यावा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौशल्य, कला गुण लक्षात घेऊन त्यांना शिक्षण दिले पाहिजे.या विद्यार्थ्यांमधून भविष्यात डॉक्टर, वकील,इंजिनियर,
शास्त्रज्ञ घडतील.
विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षक हे गावचा अभिमान निर्माण करतील.तर महाराष्ट्र शासन बांधकाम विभागाचे मा. मुख्य अभियंता राजेंद्र राहणे यांनी सुद्धा शाळेसाठी योगदान देण्याचे जाहीर केले.आपल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन आतापासूनच त्याची तयारी सुरू केली पाहिजे असे मार्गदर्शन पर म्हणाले.
विशेष म्हणजे, यावर्षी इंग्लिश मिडीयम मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळा हिवरगाव पावसा येथे प्रवेश घेतल्याने पालकांमध्ये शाळेबाबत सकारात्मक भावना निर्माण झाल्या आहेत.शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर वाढता विश्वास दिसून येत असून, त्यामुळे शाळेच्या पटसंख्येतही वाढ झाली आहे.
उपक्रमशील, विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबविणाऱ्या हिवरगाव पावसा जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा मुख्याध्यापक आर.पी.राहणे यांनी उपस्थितांसमोर मांडली. त्यांनी शाळेच्या विविध शैक्षणिक,सांस्कृतिक व गुणवत्तापूर्ण उपक्रमांची माहिती देत पालकांना आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी प्रेरित केले.या प्रवेशोत्सवामुळे नवागत विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस अविस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा उत्साह पाहता नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अतिशय उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडली.
या कार्यक्रमासाठी सरपंच सुभाष गडाख उपसरपंच सुजाता दवंगे,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष गणपत पावसे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद पावसे उपाध्यक्ष सोमनाथ भालेराव,माजी प्राचार्य बाबुराव पावसे,सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे,
सरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे, हॉटेल मयूर एक्सप्रेसचे संचालक रामनाथ पावसे, शिवसेना तालुका प्रमुख भीमाशंकर पावसे,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ पावसे, तालुका उपाध्यक्ष केशव दवंगे,
सरचिटणीस गणेश दवंगे, रामनाथ गडाख,देवगड विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीमती उगले, शिक्षक वसंत नेहे,माजी प्राचार्य रमेश पावसे,
मुख्याध्यापक आर.पी.राहणे, अक्षय खतोडे,हरिभाऊ सहाणे,श्रीमती मीनल बिडवे,
श्रीमती वाकचौरे,स्वामी समर्थ केंद्राच्या अनिता दिवटे,सुशीला पावसे, मंगल पावसे, दिगंबर पावसे, सचिन सस्कर,बच्चन भालेराव,
शाईन पठाण,आदींसह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
