जखमी व्यक्तीवर प्रवरा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू
झरेकाठी सोमनाथ डोळे राहता तालुक्यातील कोल्हार येथील बेलापूर रस्त्यावर असलेल्या राऊत वस्ती शिवारात नुकतेच एक व्यक्ती विहिरीत पडल्याची घटना घडली. घटनेतील खुशालचंद देवराम राऊत (वय ५२) असून यांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश मिळाले.
घडलेल्या घटनेची माहिती मिळताच शिर्डी नगरपरिषद अग्निशमन विभागाचे तेजस वाणी व शुभम साठे,राहाता नगरपरिषद अग्निशमन विभागाचे ऋषिकेश सदाफळ,अशोक साठे व महेंद्र कदम,तसेच श्रीरामपूर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे अनुप झरेकर,रोहित जाधव व संकेत कापसे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याशिवाय ईआरटी बचाव पथक अहिल्यानगर व आपत्ती व्यवस्थापन आपदा मित्र अनिल जाधव,रामराजे गायकवाड,विनोद पडोळकर, रवींद्र पडोळकर,मनोज पडोळकर व सुनील जाधव यांनी संयुक्तपणे बचावकार्य राबविले.
कोल्हार पोलीस व अग्निशमन दल व पोलीस मित्र यांनी अत्यंत कौशल्याने राबविण्यात आलेल्या बचाव मोहीमेतून खुशालचंद राऊत यांना जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटल,लोणी येथे रवाना करण्यात आले.या यशस्वी बचावकार्यात सहभागी सर्व पोलीस,अग्निशमन कर्मचारी व बचाव पथकाच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
