सोनगाव शकुर तांबोळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या श्रीरामपूर आगारातील ज्येष्ठ कर्मचारी हमीद गुलाब शेख यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला गौरव समारंभ नुकताच अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला.अनेक दशकांच्या प्रदीर्घ आणि निष्ठावान सेवेनंतर ते सेवानिवृत्त होत असताना यावेळी श्रीरामपूर आगारातील अधिकारी,कर्मचारी,मा. कर्मचारी,मित्रपरिवार आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमस्थळी सकाळ पासूनच शुभेच्छुकांची रेलचेल सुरू होती.प्रत्येकाच्या ओठांवर हमीद शेख यांच्याविषयी आदराचे शब्द आणि मनात त्यांच्या सहवासाच्या आठवणी होत्या.त्यामुळे हा केवळ सेवानिवृत्ती समारंभ न राहता,एका लोकप्रिय आणि सर्वमान्य व्यक्तिमत्त्वाविषयीच्या प्रेमाचा उत्सव ठरला.
मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी वक्त्यांनी आपल्या मनोगतातून श्री. शेख यांचे कार्य, शिस्तप्रियता, प्रामाणिकपणा, सहकार्याची वृत्ती आणि सर्वांना आपलेसे करून घेण्याच्या स्वभावाचे विशेष कौतुक केले.
श्रीरामपूर कार्यशाळेत प्रमुख कारागीर म्हणून काम करताना त्यांनी उत्कृष्ट नियोजन, जबाबदारीची जाणीव आणि कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन केलेल्या कार्यामुळे आगाराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला.अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "हमीद शेख हे आमच्यासाठी केवळ सहकारी नव्हते, तर मार्गदर्शक, आधारवड आणि संकटसमयी धावून येणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व होते."
सत्काराला उत्तर देताना श्री.शेख यांनी सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला. त्यांनी व्यक्त केलेल्या भावना ऐकून सभागृहातील अनेक कर्मचारी भावूक झाले. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
समारंभानंतर आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमात सर्व उपस्थितांनी सहभाग घेतला. शुभेच्छुकांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
कर्तव्यनिष्ठा, माणुसकी, सहकार्य आणि जिव्हाळ्याच्या नात्यांचा सुंदर संगम असलेला हा गौरव सोहळा श्रीरामपूर आगाराच्या इतिहासातील संस्मरणीय अध्याय ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
