वारकऱ्यांचे आशीर्वाद हिच आमची संपत्ती-डॉ.सुजय विखे पाटील

Cityline Media
0
आषाढी वारीत विखे पाटील परिवाराची सेवाभावाची परंपरा कायम

जनसेवा तर्फे  १५ हजारांहून अधिक वस्तूचे वाटप;हजारो वारकऱ्यांसाठी भव्य मुक्काम व सर्व सुविधा उपलब्ध

पंढरपूर प्रतिनिधी वारकरी बांधवांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच आमची खरी संपत्ती आहे.व समाजसेवा आणि वारकरी सेवेला विखे पाटील परिवाराने नेहमीच प्राधान्य दिले असून,आषाढी वारीच्या निमित्ताने ही सेवाभावाची परंपरा अधिक सक्षमपणे पुढे सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली.

यानिमित्ताने डॉ.सुजय विखे पाटील यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील स्मृती मंडळाच्या भक्तनिवास मठात मुक्कामी असलेल्या वारकरी दिंड्यांना भेट देत वारकरी बांधवांशी मनमोकळा संवाद साधला.त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत विठ्ठलभक्तांच्या सेवेसाठी विखे पाटील परिवार कायम कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.

आषाढी वारीदरम्यान अहिल्यानगर, नाशिक तसेच राज्यातील विविध भागांतून पायी पंढरपूरला येणाऱ्या वारकरी बांधवांसाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील स्मृती मंडळाच्या सुमारे सात हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या भव्य मंडप व भक्तनिवास मठात मुक्कामाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून निवास, भोजन, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे,वैद्यकीय मदत तसेच इतर आवश्यक सुविधा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

सध्या चाळीसहून अधिक वारकरी दिंड्या या भक्तनिवासात मुक्कामी असून हजारो वारकरी या सेवांचा लाभ घेत आहेत.पंढरपूरमधील सर्वात मोठ्या आणि सुसज्ज वारकरी सेवा मंडपांपैकी हा एक मंडप असून, वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवक चोवीस तास सेवेत तत्पर आहेत.

यावेळी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फाउंडेशनच्या वतीने वारकरी बांधवांना १५ हजारांहून अधिक रेनकोट आणि शबनम बॅगचे वितरण करण्यात आले. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले,वीस ते पंचवीस दिवसांचा पायी प्रवास करून वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होतात. त्यांच्या मुक्कामाची, सुरक्षिततेची आणि सर्व सोयी-सुविधांची उत्तम व्यवस्था व्हावी, यासाठी विखे पाटील परिवार आणि जनसेवा फाउंडेशन सातत्याने कार्यरत असते. ही सेवा अखंड ४० वर्षा पासून अविरत सुरू आहे . तसेच वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही उणीव राहू नये, हीच आमची भूमिका असून त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आशीर्वाद हीच आमची खरी संपत्ती आहे.

भक्तनिवासातील सर्व दिंड्यांना भेट देऊन डॉ. सुजय विखे पाटील यांनी वारकरी बांधवांची विचारपूस केली. विखे पाटील परिवाराच्या वतीने सर्व वारकरी भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि समाधान नांदो, अशी प्रार्थना त्यांनी केली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!