आषाढी एकादशीची वारी बालवयातुनच अनुभवावी

Cityline Media
0
पंढरपूरची वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही,तर ती मानवी जीवन समृद्ध करणारी एक चैतन्यमय पाठशाळा आहे.संत ज्ञानदेवांच्या अभंगवाणीत जसा आषाढी वारीबद्दलचा जिव्हाळा आणि ओढ स्पष्टपणे जाणवते, तसाच अनुभव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असतो.आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी जेव्हा पायी चालत पंढरपूरच्या दिशेने निघतात,तेव्हा तो केवळ एक भौगोलिक प्रवास नसून आत्म्याचा परमात्म्याशी आणि स्वतःच्या अंतरंगाशी साधलेला एक पवित्र संवाद असतो.
संतांच्या सानिध्यात चालणे ही एक शारीरिक साधना आहे,तर मुखाने सतत नामास्मरण करणे ही वाचिक साधना आहे आणि विठुरायाच्या अखंड स्मरणात तल्लीन राहणे ही मानसिक साधना आहे. ही साधना माणसाला त्याच्या आयुष्याच्या अंतिम ध्येयापर्यंत आणि आत्मिक आनंदापर्यंत पोहोचवण्याचे अचूक सामर्थ्य बाळगून असते,आणि म्हणूनच ही वारी यशस्वी आणि आनंदी जीवनाची प्रतिक्रिया मानली जात असते.

आजच्या या वेगवान, यांत्रिक आणि डिजिटल जगात माणूस स्वतःपासूनच दुरावला गेला आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आणि सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत हरवलेल्या तरुण पिढीसाठी तर वारी हे एखाद्या 'रिसेट बटन'सारखे काम करते येथे कोणताही देखावा नसतो,कोणतीही स्पर्धा नसते,तर केवळ समता,प्रेम,जिव्हाळा आणि निखळ समाधान असते.

म्हणूनच आजच्या तरुण पिढीने वारीत आवर्जून सहभागी झाले पाहिजे, कारण वारी शरीरापेक्षा मन आणि विचारांना अधिक सकारात्मक चालना देते आणि जीवनाचा खरा अर्थ समजून घेत स्वतःशी अधिक प्रामाणिक राहण्याची अमूल्य शिकवण देते.

अनेकदा वारी ही केवळ वयोवृद्धांची आहे,असा एक गैरसमज समाजात पाहायला मिलताे,परंतु हा दृष्टिकोन बदलण्याची आज नितांत गरज आहे.आयुष्याचा खरा अर्थ शोधून काढायचा असेल आणि स्वतःच्या अंतरंगाला खऱ्या अर्थाने ओळखायचे असेल,तर वारीसारखा सोपा, सुंदर आणि प्रभावी मार्ग दुसरा कोणताच असू शकत नाही.

अध्यात्मातील खोल गर्भितार्थ आणि जीवनाचे तत्त्वज्ञान पुस्तकी ज्ञानापेक्षा अशा अनुभवांमधून अधिक चांगल्या प्रकारे समजते, हीच वारकरी संप्रदायाची खरी महती आहे.आजची तरुण पिढी करिअरच्या मागे धावताना,सततची स्पर्धा आणि सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकल्यामुळे स्वतःशीच संवाद हरवून बसली आहे.

अशा अस्वस्थ करणाऱ्या काळात वारी माणसाला स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याची संधी देते. लाखो वारकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून चालताना नकळतपणे ही जाणीव होते की आपण या जगात कधीही एकटे नाही आहोत.

प्रत्येकाच्याच वैयक्तिक आयुष्यात काही ना काही सुख-दुःख आणि अडचणी असतातच,परंतु तरीही हे वारकरी हसत-मुजत,विठू नामाचा गजर करत पुढे चालत असतात. रोजच्या यांत्रिक आणि दमछाक करणाऱ्या रहदारीला आणि संसाराच्या गाड्याला विसरायला लावणारी ही वारी म्हणजे एकप्रकारे आत्म्याला ऊर्जा देणारे 'चार्जिंग स्टेशन'च असते, जे वर्षभर जगण्यासाठी आवश्यक असणारी मानसिक ताकद  पुरवते.

वारीमध्ये कोणतीही लाडिक किंवा अवाजवी सोयी-सुविधा नसतात, त्यामुळे तेथे प्रत्येक गोष्टीशी एक सहज जुळवून घेणे शिकावे लागते. मोठ्या आलिशान सोयी किंवा फास्ट फूड  तिथे नसते, तर जे मिळेल त्यात आणि जशी परिस्थिती असेल त्यात आनंद मानण्याची शिकवण वारी देते.

कधी रणरणत्या उन्हात लांबचा प्रवास करावा लागतो, तर कधी मुसळधार पावसात चिंब भिजत चालावे लागते, परंतु असे असूनही प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि हास्य कधीही मावळत नाही.

खऱ्या आयुष्यातही तर असेच असते; सर्व काही आपल्या मनासारखे आणि अपेक्षेनुसार घडत नाही, परंतु प्रत्येक कठीण परिस्थितीतही स्वतःला जुळवून घेण्यातच  खऱ्या आनंदाची प्राप्ती होते. वारीतून मिळणारी ही जगण्याची शिदोरी आणि शिकवण जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही मिळू शकत नाही.

वारी आपल्याला सर्वात मोठी शिकवण देते ती म्हणजे समतेची.वारकरी संप्रदायात स्त्री-पुरुष भेदाभेद किंवा उच्च-नीचतेचा भाव पूर्णपणे विरून जातो, कारण तिथे केवळ 'माऊली' म्हणजेच एकमेकांविषयीचा जिव्हाळा आणि अस्सल माणुसकी शिल्लक राहते.

संत ज्ञानदेवांनी ज्या वारकरी संप्रदायाची पायाभरणी केली, त्याचा मूळ आधारच समता हा आहे. यामुळेच सर्व  लोक एकत्र येऊन एकरूप होतात. या पवित्र वाटेवर पैशाला किंवा सामाजिक प्रतिष्ठेला कोणतेही मोल नसते, तर तिथे केवळ माणसाच्या मनातील निर्मळ माणुसकीला किंमत असते. आजच्या समाजात तरुणांनी हा समतेचा आणि बंधुभावाचा संदेश नीट समजून घेतला, तर आपला संपूर्ण समाज अधिक सुंदर आणि संवादी होईल यात शंका नाही.

याशिवाय, वारी माणसाला संयमाचे उत्तम धडे शिकवते. आजच्या 'इन्स्टंट' युगात माणसाला प्रत्येक गोष्ट क्षणात हवी असते, परंतु वारी आपल्याला संयमाची महती पटवून देते. हळूहळू आणि सातत्याने आपल्या ध्येयाच्या दिशेने, म्हणजेच विठुरायाच्या चरणांच्या ओढीने चालत राहणे म्हणजेच वारी आहे.

त्या संयमी प्रवासातून, परिश्रमातून आणि साधनेतूनच परमत्म्याची खरी भेट होते. घाईघाईत घेतलेले निर्णय बहुतांश वेळा चुकीचे ठरतात, परंतु शांतपणे आणि सातत्याने केलेले प्रामाणिक प्रयत्न नेहमीच योग्य ठरतो.

आनंद आणि परमानंदाची अनुभूती घेणे हा वारीचा आणखी एक मोठा गाभा आहे. वारकरी लोक अगदी साध्या आणि छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात, मृदुंगाच्या तालावर नाचतात. हा आनंद पूर्णपणे सात्त्विक असतो, कारण तो बाहेरून नसून माणसाच्या अंतरंगातून प्रगट होत असतो.

म्हणूनच संतांनी सांगितले आहे की, वारी ही केवळ ऐकण्याची,वाचण्याची किंवा समजून सांगण्याची गोष्ट नाही, तर ती प्रत्यक्ष अनुभण्याची गोष्ट आहे. आजच्या तरुण पिढीने वारीचे हे मर्म अनुभवले पाहिजे, जेणेकरून त्यांना कळून येईल की आयुष्य म्हणजे केवळ धावपळ नाही, तर माणसांशी खरी नाती जोडणे आणि स्वतःशी खरा संवाद साधणे हे किती महत्त्वाचे आहे.

वारी म्हणजे स्वतःला शोधण्याचा एक सुंदर प्रवास आहे,अविरत चालणारे आयुष्य अधिक सुंदर आणि समृद्ध होईल.म्हणूनच आयुष्यात कमीत कमी एकदा तरी आवर्जून वारी करून पहावी. यामुळे माणसाचा संपूर्ण आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो.

वारीत विठ्ठल भेटतो का असा प्रश्न बऱ्याचदा अनेकांच्या मनात येतो, परंतु त्याचे उत्तर असे आहे की, विठ्ठल वारीत पावलोपावली भेटतो; कधी तो माणुसकीच्या रूपाने भेटतो, कधी मदतीचा हात म्हणून भेटतो, तर कधी निखळ संवादाच्या रूपाने भेटतो. जीवनाचे सारे सार केवळ आणि केवळ वारीतच अनुभवायला मिळते.  ज्ञानदेवांसारखेच एका ओवीत म्हणतात, 'एक तरी वारी अनुभवावी', आणि अगदी तसेच आपणही आपल्या आयुष्यात एकदा तरी ही  वारी आवर्जून अनुभवायलाच हवी.

रुपाली निलेश भालेराव
 लोणी ता.राहाता

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!