लोणी रुपाली भालेराव राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील पद्मश्री नगर परिसरातील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) येथे नुकताच गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत चैतन्यमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अनेक भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणारे श्री. स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र आहे या पवित्र निमित्ताने पहाटेपासूनच विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये शेकडो भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला.
उत्सवाची सुरुवात पहाटेच्या प्रहरी अत्यंत शिस्तीत आणि पावित्र्यात झाली. पहाटे सहा वाजता श्री स्वामी समर्थ मूर्तीवर विधिवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी सहा ते साडेसहा वा.दरम्यान सर्व सेवकांनी एकत्र येत संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ केला, ज्यामुळे एक सुंदर सेवाभावी वातावरण तयार झाले.स्वच्छता करताना प्रत्येक जण प्रामाणिकपणे आपले काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करतो यानंतर भूपाळी आरती आणि सकाळी आठ वाजता काकड आरती पार पडली.त्यानंतर साडेआठ वाजता सामूहिक अभिषेक झाला,ज्यामध्ये उपस्थित भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सकाळी नऊ ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत अखंडितपणे गुरुपूजन (गुरुपद) सुरू होते,ज्याचा लाभ सर्व आलेल्या भाविकांनी घेतला.श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी नेहमी उभे आहे ते नेहमी भक्तांचे रक्षण करतात अशी भावना येणाऱ्या प्रत्येक भाविकांमध्ये दिसून येते नेहमीप्रमाणे सकाळी साडेदहा वाजता स्वामींची महापूजा आणि महाआरती उपस्थित सर्व भाविक वर्गाच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली.या उत्सवाचे एक विशेष आकर्षण म्हणजे लोणी परिसरातील सभोवताली असणाऱ्या महिला सेवेकरी यांनी अत्यंत एकाग्रतेने केलेले गुरुचरित्र आणि सप्तशती एकाच वेळी सामुदायिक स्वरूपात मोठ्या आवाजात पठण विशेष ठरले.तसेच दिवसभर महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून साखळी पद्धतीने सुंदर वीणावादन करून वातावरणात चैतन्य निर्माण केले.
संध्याकाळच्या सत्रात सहा वाजताच्या आरतीनंतर उपस्थितांसाठी विशेष आध्यात्मिक मार्गदर्शन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.या संपूर्ण उत्सवात परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली.जास्तीत जास्त भाविकांनी स्वामींच्या दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला केंद्राच्या वतीने संयोजकांनी केलेल्या आवाहनाला भाविक उत्तम प्रतिसाद दिला.
