लोणी रुपाली भालेराव राहाता तालुक्यातील लोणी बसस्थानक परिसरात माणुसकीचे एक आगळेवेगळे दर्शन घडले असून,एका आजोबांचा हरवलेला मोबाईल लोणी बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक रावसाहेब पर्वत यांनी आपल्या सतर्कतेने व प्रामाणिकपणाने त्यांना परत मिळवून दिल्याने वृद्ध आजोबांनी समाधान व्यक्त केले.घडलेली घटनेबाबत वृत्त असे की,एका प्रवाशाचा मोबाईल पंढरपूर-नाशिक बसमध्ये प्रवास करत असताना हरवला होता.या बस मधील प्रवासी बबन नामदेव रांधवणे हे कोल्हार येथे उतरले असता त्यांच्या लक्षात आले की त्यांचा मोबाईल बसमध्येच राहिला आहे.
त्यांनी तत्काळ ही बाब कोल्हार येथील वाहतूक नियंत्रकांच्या निदर्शनास आणून दिली.कोल्हार येथील वाहतूक नियंत्रकांनी कोणतीही दिरंगाई न करता लोणी बसस्थानकावरील वाहतूक नियंत्रक रावसाहेब पर्वत यांच्याशी संपर्क साधून संबंधित बसचा शोध घेण्यास सांगितले. यावेळी रावसाहेब पर्वतयांनीही तत्परता दाखवत पंढरपूर-नाशिक बसचा शोध घेऊन त्यामध्ये असलेला मोबाईल ताब्यात घेतला.
मोबाईल सापडल्यानंतर रावसाहेब पर्वत यांनी बबन नामदेव रांधवणे यांना बोलावून घेतले खात्रीनंतर त्यांना तो मोबाईल देण्याचा निर्णय घेतला यावेळी पत्रकार रूपाली भालेराव यांच्या उपस्थितीत तो मोबाईल संबंधित प्रवाशाला सुपूर्द केला. आपला हरवलेला मोबाईल सुरक्षित हाती परत मिळाल्यानंतर संबंधित वृद्धाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहून उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच माणुसकीचा हा अनुभव सुखावून गेला.
आजच्या धावपळ आणि धकाधकीच्या काळात माणुसकी हरवत चालली असल्याची टीका होत असताना,लोणी बसस्थानकावरील या घटनेने माणुसकीचा अंकुर आजही जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे.रावसाहेब पर्वत यांनी दाखवलेली ही तत्परता आणि प्रामाणिकपणा खरोखरच कौतुकास्पद असून,या घटनेमुळेच जणू काही पांडुरंगच भेटल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
लोणी बस स्थानक येथील वाहतूक नियंत्रक रावसाहेब पर्वत यांचे काम नेहमीच प्रामाणिकपणा आणि कार्य सतर्कता दिसून येते प्रवाशांचे कोणतेही प्रश्न असो कुठलेही हरवलेली गोष्ट असो नियंत्रक पर्वत यांचेकडे उत्तर नेहमीच मिळते.त्यामुळे लांबवर प्रवास करून आलेल्यांना सुद्धा माणुसकीचा आपलेपणाचे दर्शन लोणी बस स्थानक येथे घडते.हरविलेला मोबाईल मिळाल्यानंतर प्रवाशाने वाहतूक नियंत्रक रावसाहेब पर्वत व एसटी महामंडळ यांचे आभार मानले.
