कोल्हार येथे अण्णाभाऊ साठे जयंती,लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा
कोल्हार (अरुण बोरुडे) साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त राहता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शाळेतील २४ विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्य, साहित्य,सामाजिक योगदान तसेच राष्ट्रनिर्मितीतील कार्यावर प्रभावी, अभ्यासपूर्ण व भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पत्रकार अरुण बोरुडे म्हणाले, "महापुरुषांचे विचार हेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचे दीपस्तंभ आहेत.महापुरुषांचे विचार केवळ पाठ्यपुस्तकांत न राहता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजले पाहिजेत.त्यांचे विचार आचरणात आणणारी पिढीच देशाला प्रगतीच्या दिशेने नेऊ शकते."
प्रसंगी पुढे बोलताना श्री.बोरुडे म्हणाले की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी औपचारिक शिक्षण कमी घेतले असले,तरी आपल्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर कादंबऱ्या,कथा, लोकनाट्य,पोवाडे आणि विविध साहित्यकृती निर्माण करून मराठी साहित्यविश्वात अजरामर स्थान मिळविले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, दारिद्र्य आणि संघर्ष यांवर मात करून त्यांनी आपल्या लेखणीतून समाजप्रबोधनाचे महान कार्य केले. त्यामुळे परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द,मेहनत आणि शिक्षणाच्या बळावर प्रत्येक विद्यार्थी यश संपादन करू शकतो.
यावेळी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट वक्तृत्वाचे कौतुक करत पत्रकार अरुण बोरुडे व पंडितराव जगधने यांनी विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन त्यांचा उत्साह वाढविला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयराव बोरुडे, उपाध्यक्ष अनिल कांबळे, सदस्य राजेंद्र गुजर, कोषाध्यक्ष सुनील बोरुडे, विलास बोरुडे, दत्तात्रय पेटारे, महेश बोरुडे, प्रकाश सरोदे,पंडितराव जगधने, पत्रकार अरुण बोरुडे तसेच ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक साहेबराव अनाप यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सविता कडलग,हौशिनाथ सजन, विद्या उदावंत, मनिषा शिंदे, शितल देशमुख, लता गाडेकर तसेच राजेंद्र बोकंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
