म्हेळुस्के येथे बौद्ध युवकास जातीवाचक शिवीगाळ व मारहाण

Cityline Media
0
सहा जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल 

नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील म्हेळुस्के,येथे शेतजमिनीच्या सपाटीकरणाच्या कामावरून झालेल्या वादातून एका बौद्ध युवकास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून सहा जणांविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घडलेल्या या प्रकरणात दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा म्हेळुस्के गावचे उपसरपंच योगेश बर्डे, तसेच गोटीराम बर्डे, सागर बर्डे, समाधान शिंदे, निवृत्ती मेधने आणि मंगेश मेधने यांचा आरोपी म्हणून समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोकलेनचे काम बंद करण्यास सांगितल्याचा आरोप करत फिर्यादी पुंडलिक गांगुर्डे यांच्या तक्रारीनुसार,नुकतेच ते साहेबराव गंगाधर कदम यांच्या शेतात पोकलेन मशीनद्वारे जमिनीचे सपाटीकरण करीत होते.त्यावेळी संबंधित व्यक्तींनी पोकलेनचे काम बंद करण्यास सांगितले.त्यानंतर वाद वाढला.

फिर्यादीच्या आरोपानुसार,सागर बर्डे यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर इतर आरोपींनी त्यांना पकडून ठेवले.यावेळी जातीवाचक शब्दांचा वापर करून अपमान करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच पोलीस तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या प्रकरणात खोट्या पोलीस तक्रारी दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या तक्रारीवरून दिंडोरी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील लागू कलमे तसेच भारतीय न्याय संहिता  मधील लागू कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस.स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शेळके यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.

तपास पथकात अमोल पवार (सहाय्यक पोलीस निरीक्षक), विजय चव्हाण (सहाय्यक उपनिरीक्षक),रोहिणी सोनवणे (पोलीस हवालदार, कळवण), भगवान मथुरे (पोलीस निरीक्षक, दिंडोरी), सोपान राकौंडे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, दिंडोरी) आणि पराग गोतुरणे (हेड कॉन्स्टेबल) यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान,अनिल वैद्य, माजी न्यायाधीश, प्रवीण गांगुर्डे,महेंद्र काळे,ॲड.सिंधू पगारे, रविराज सोनवणे आणि साहील सोनवणे हे फिर्यादीला न्याय मिळावा यासाठी सहकार्य करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!