पारनेरच्या पाणी प्रश्नावर मुंबईत महत्वपूर्ण बैठक

Cityline Media
0
वर्षभरात योजना पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष विजय औटी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट

पारनेर प्रतिनिधी पारनेर शहराच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाला कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारनेर नगरपंचायतीचे मा. नगराध्यक्ष विजय औटी यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पाणीपुरवठा योजनेबाबत सविस्तर चर्चा केली.
पारनेर शहराची वाढती लोकसंख्या, भविष्यातील पाण्याची वाढती गरज तसेच सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत औटी यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष वेधले.पारनेर शहरासाठी दीर्घकालीन आणि शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घेऊन कालबद्ध पद्धतीने या योजनेचे काम मार्गी लावावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारनेर शहराच्या पाणी प्रश्नाकडे शासन सकारात्मकपणे पाहत असून येत्या सहा महिन्यांत या योजनेच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल. त्यानंतर साधारण एका वर्षाच्या कालावधीत योजना पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील,असे आश्वासन दिले.

पारनेर शहराचा पाणी प्रश्न हा दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या टंचाईपुरता मर्यादित नसून भविष्यातील शहराची गरज लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे नव्या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पारनेरकरांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा पाठपुरावा करण्यात आला असल्याचे मा. नगराध्यक्ष विजय औटी यांनी सांगितले.

“पारनेरकरांचा पाणीप्रश्न हा आमच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय आहे. नागरिकांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये,यासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे या प्रश्नाला आता गती मिळत आहे. निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष काम कालबद्ध पद्धतीने पूर्ण करून पारनेरकरांना दिलासा मिळावा, यासाठी पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा केला जाईल,”असे विजय औटी यांनी सांगितले.

पारनेर शहराच्या पाणी प्रश्नासाठी झालेल्या या पाठपुराव्यामुळे आगामी काळात शहरासाठी शाश्वत पाणीपुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!