वीज वाहिन्या व पडलेले खांब दुरुस्त केले
संगमनेर नितीनचंद्र भालेराव तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे मंगळवारी झालेल्या जोरदार वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले,घरांवरील पत्रे उडून गेली,झाडे व विद्युत खांब पडले तसेच विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या घटनेची तात्काळ दखल घेत भाजपाचे संगमनेर तालुका उपाध्यक्ष केशव बाळू दवंगे यांनी आमदार अमोल खताळ यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली.
जोरदार वादळामुळे हिवरगाव पावसा येथे विद्युत खांब व वीज वाहिन्यांचे मोठे नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता.आमदार खताळांच्या सूचनेनुसार महावितरणच्या पथकाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले.
प्रसंगी तलाठी श्री.आवारी व ग्रामसेवक हरीश गडाख यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून वादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे पूर्ण केले.या तातडीच्या कार्यवाही बद्दल हिवरगाव पावसा ग्रामस्थांच्या वतीने आमदार अमोल खताळ, प्रांताधिकारी उंडे,तहसीलदार धीरज मांजरे,गटविकास अधिकारी सिनारे तसेच महसूल व ग्रामविकास विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
महावितरणचे संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवणे व उपकार्यकारी अभियंता घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक अभियंता शेख यांच्या नेतृत्वात जोडारी पोटे,देवकर,बावणे, विशाल रहाणे व त्यांच्या पथकाने अहोरात्र मेहनत घेऊन तुटलेल्या वीजवाहिन्या व पडलेले खांब दुरुस्त केले.महावितरणचे अधिकारी व संपूर्ण पथकाने संकटाच्या काळात दिवस-रात्र मेहनत घेऊन वीजपुरवठा पूर्ववत केल्याबद्दल महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.
