राहता प्रतिनिधी राहाता अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे आयोजित योगिराज सद्गुरू गंगागिरी महाराज १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तन सोहळ्यात राजकीय वादाची मोठी ठिणगी पडली आहे. ७ ते ८ लाख भाविकांच्या अथांग जनसागराच्या उपस्थितीत पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्यात महायुती सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) नेतृत्वाला व योगदानाला डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष तथा संगमनेर पंचायत समितीचे मा. सदस्य सरूनाथ उंबरकर यांनी भाजप विधान परिषद आमदार विवेक कोल्हे यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला आहे.
नुकतेच धनगरवाडी येथे पार पडलेल्या काल्याच्या कीर्तन सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावरून भाषण करताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र महिला सक्षमीकरण २०२६' तसेच शेतकरी व शेतमजुरांसाठीच्या नवीन कल्याणकारी योजनांच्या मंजुरीची घोषणा केली.मात्र,या कार्यक्रमा दरम्यान मंचावर उपस्थित भाजप आमदार विवेक कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख हेतुपुरस्सर टाळल्याचा आरोप सरूनाथ उंबरकर यांनी केला आहे.
धार्मिक कार्यक्रमात राजकारण नको
राज्यात सध्या तीन पक्षांचे महायुती सरकार सत्तेवर असताना धार्मिक सोहळ्याच्या व्यासपीठावरून भाजप आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे नाव डावलणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. दिवंगत अजित पवार जर हयात असते तर त्यांचे नाव टाळण्याची हिम्मत कुणाची झाली नसती.असे उंबरकर यांनी स्पष्ट करत पुढे सांगितले की ज्या कोल्हे घराण्याला पवार कुटुंबानी प्रतिष्ठा दिली त्यांनीच आज पवार कुटुंबातील एका उपमुख्यमंत्री असलेल्या महिलेला प्रतिष्ठा देण्यात कानकुस केली.ना.सुनेत्रा पवाराचे नाव टाळून राष्ट्रवादीच्या योगदानाला उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप आ.विवेक कोल्हे यांचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो! यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष धार्मिक आणि आध्यात्मिक व्यासपीठाचा वापर राज्य सरकारच्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी करत असताना महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) डावलल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
अथांग जनसागरासमोर झालेल्या या प्रकारामुळे महायुतीतील स्थानिक घटक पक्षांमधील दरी पुन्हा एकदा समोर आली असून,आगामी काळात या घटनेचे तीव्र राजकीय पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.
