भाजपचे ज्येष्ठ नेते वाल्मीक शिंदे यांची माजी आमदार आणि पदवीधर आमदारावर जोरदार टीका
संगमनेर प्रतिनिधी संगमनेरात परिवर्तन झाल्यानंतर आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून विकासकामांना खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. त्यामुळे आता संगमनेरच्या विकासाचा वेग कायम ठेवण्याची आणि विकासाला नवी दिशा देण्याची जबाबदारी आमदार अमोल खताळ यांच्या खांद्यावर आहे.माजी आमदार आणि पदवीधर आमदार यांनी न केलेल्या कामांचे फुकटचे श्रेय घेऊ नये,अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते वाल्मीक शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नुकतीच केली.
तालुक्यातील चिकणी येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या निधीतून पशुवैद्यकीय दवाखान्याच्या संरक्षक भिंतीचे काम मंजूर करण्यात आले होते. या कामाचे उद्घाटन नुकतेच जून आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाले होते.
या पार्श्वभूमीवर संगमनेर मधील विकास कामांच्या श्रेयावरून सुरू असलेल्या राजकीय वादावर भाष्य करताना वाल्मीक शिंदे म्हणाले की,महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर तालुक्यात विविध विकासकामे मंजूर करून आणली आहेत. मात्र, ही कामे आपणच मंजूर करून आणल्याचा दावा करून माजी आमदार आणि पदवीधर आमदार जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्या कामासाठी कोणी प्रयत्न केले आणि निधी कोणी मंजूर करून आणला, याची माहिती जनतेला असल्याचे सांगत शिंदे यांनी माजी आमदार आणि पदवीधर आमदार यांच्यावर जोरदार टीका केली.
संगमनेरच्या राजकारणात विकासकामांच्या श्रेयावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना वाल्मीक शिंदे यांनी आमदार अमोल खताळ यांच्या कामकाजाचे समर्थन केले. केवळ विकासकामांचे श्रेय घेऊन जनतेची सहानुभूती मिळविण्यापेक्षा प्रत्यक्ष कामातून विकास साधणे महत्त्वाचे आहे. तालुक्यातील विविध भागांमध्ये पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांशी संबंधित कामांना चालना देण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांनी विकासकामांना प्राधान्य देऊन मंजूर निधीतून सुरू असलेली कामे पूर्णत्वास नेण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
संगमनेरच्या विकासाला नवी दिशा देण्याची जबाबदारी आमदार अमोल खताळ यांच्यावर आली आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, अशा अनेक विषयांवर नागरिकांच्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांची पूर्तता करताना विकासकामांचा वेग कायम ठेवणे आणि शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आगामी काळातही विकासाचा हा वेग कायम राहील आणि संगमनेर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा वाल्मीक शिंदे यांनी व्यक्त केली.
