विकासाच्या नावाखाली वनसंपत्तीचा विनाश थांबवा;वन्यजीव,पक्षी आणि दुर्मिळ वनस्पतींचे अस्तित्व नष्ट
जामखेड प्रतिनिधी सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील भीमाशंकर हा जैवविविधतेने समृद्ध आणि पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील परिसर आहे.येथील जंगलांमध्ये विविध वृक्ष,औषधी वनस्पती, पक्षी,सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी आणि असंख्य कीटकांचे वास्तव्य आहे.मात्र,विकासाच्या नावाखाली होणारी वृक्षतोड या संपूर्ण नैसर्गिक परिसंस्थेसाठी गंभीर धोका ठरू शकते.असा इशारा जामखेड येथील युवा शास्त्रज्ञ निसर्ग व जैवविविधता संशोधक डॉ.रणजित राऊत यांनी माध्यमांसमोर नुकताच दिला आहे.
प्रसंगी पुढे बोलताना डॉ.राऊत म्हणाले की एखादे झाड म्हणजे केवळ लाकूड किंवा सावली नव्हे,तर ते अनेक पक्ष्यांचे घरटे, वन्यजीवांचा निवारा आणि असंख्य कीटकांचे अधिवास असते.वृक्षतोडीमुळे पक्ष्यांची घरटी,अंडी, पिल्ले आणि झाडांच्या ढोलीत राहणाऱ्या जीवांचे अस्तित्व धोक्यात येते.
अधिवास नष्ट झाल्यामुळे वन्यजीवांना स्थलांतर करावे लागते आणि मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण होते.भीमाशंकर परिसरातील पश्चिम घाटाच्या जंगलांमध्ये अनेक दुर्मिळ आणि स्थानिक वनस्पती आढळतात.
वृक्षतोडीमुळे जंगलातील तापमान,आर्द्रता,प्रकाश आणि मातीतील ओलावा बदलून या वनस्पतींच्या अस्तित्वावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर वृक्षांची मुळे मातीची धूप रोखण्यास,पाणी जमिनीत मुरण्यास आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करण्यास मदत करतात. त्यामुळे जंगलांचा विनाश पर्यावरणीय संतुलनालाही बाधा पोहोचवू शकतो.
मोठा वृक्ष तयार होण्यासाठी अनेक दशके लागतात.वृक्ष तोडीनंतर काही रोपे लावली म्हणजे जुन्या जंगलाची भरपाई होत नाही.कारण जुन्या वृक्षांनी निर्माण केलेली नैसर्गिक अधिवास व्यवस्था पुन्हा विकसित होण्यासाठी दीर्घकाळ लागतो.
विकासाला विरोध नाही;मात्र तो निसर्गाचा विनाश करून साधणे योग्य नाही हा खऱ्या शासकांचा डाव आहे हे वेळोवेळी पुढे सिद्ध होईलच भीमाशंकर सारख्या संवेदनशील परिसरात कोणताही विकास प्रकल्प राबविण्यापूर्वी सखोल पर्यावरणीय परिणाम मूल्यमापन, जैवविविधतेचे शास्त्रीय सर्वेक्षण आणि वन्यजीवांच्या अधिवासांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
शासन आणि वनविभागाने वृक्ष तोडी बाबत संवेदनशील भूमिका घेऊन भीमाशंकरच्या नैसर्गिक वारशाचे संरक्षण करावे.कारण आज तोडलेला वृक्ष पुन्हा मोठा होण्यासाठी अनेक दशके लागतील; मात्र त्यावर अवलंबून असलेल्या असंख्य जीवांचे नुकसान कदाचित कधीही भरून निघणार नाही.जंगल वाचवा, जैवविविधता जपा; निसर्ग टिकला तरच मानवाचे भविष्य सुरक्षित राहील असेही डॉ.राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.
