आबा निर्मळ, प्रमोद निर्मळ यांच्या सामाजिक जाणिवेचा प्रत्यय
शिर्डी प्रतिनिधी दुष्काळ, कर्जबाजारीपणा, सावकारी वसुली आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याच्या जीवनसंघर्षाचे वास्तववादी चित्रण करणारी एन व्हिजन फिल्म निर्मित ‘कोरडा दुष्काळ’ ही मराठी शॉर्टफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्माते आबा निर्मळ आणि दिग्दर्शक प्रमोद निर्मळ यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
शेतात पाऊस पडला नाही की केवळ पिकांचे नुकसान होत नाही, तर शेतकरी कुटुंबाच्या स्वप्नांवरही पाणी फिरते. मुलांचे शिक्षण, मुलीच्या संसाराची चिंता, कर्जाची परतफेड आणि घरखर्चाची ओढाताण अशा अनेक समस्यांना शेतकऱ्याला सामोरे जावे लागते. या संघर्षाचे भावनिक आणि वास्तववादी चित्रण ‘कोरडा दुष्काळ’ या चित्रपटातून मांडण्यात आले आहे. संकटांनी घेरलेल्या शेतकरी कुटुंबाच्या आयुष्यात पुढे काय घडते, याबाबत चित्रपटाच्या कथानकातील उत्कंठा कायम ठेवण्यात आली आहे.
आबा निर्मळ यांनी चित्रपटाची कथा व पटकथा लिहिली असून, प्रमोद निर्मळ यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. विशेष सहकार्य पप्पू लोणारी यांचे आहे. चित्रपटात मनीषा गुळवे, ज्ञानेश्वर थोटे, बिराजी घोगरे, प्रमोद निर्मळ, पप्पू लोणारी, मीना निर्मळ, तृप्ती जोशी,आबा निर्मळ, अमृता आकाश धुमाळ आणि आकाश माणिक धुमाळ हे कलाकार भूमिका साकारत आहेत.
चित्रपटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न, कर्जबाजारीपणा आणि ग्रामीण कुटुंबांची आर्थिक ओढाताण यांकडे समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकऱ्याला केवळ सहानुभूती न देता संकटाच्या काळात आधार देण्याची गरज आहे.
