जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसह सेफ्टी कोर्समध्ये खेळाडू सहभागी होणार
राहाता प्रतिनिधी राहाता रायफल असोसिएशनच्या डी.के.स्पोर्ट्स क्लबच्या १० खेळाडूंची जानेवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय रायफल व पिस्तोल शूटिंग स्पर्धेसाठी तसेच सेफ्टी कोर्ससाठी निवड झाली आहे.या निवडीमुळे राहाता तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
निवड झालेल्या खेळाडूत दिशांत प्रदीप वीटकरे ,यशराज श्रीपाद देशपांडे, सानवी अनिल धिरडे, विहान तेजस सूर्यवंशी, रिदा गयास शेख, आयान अन्वर सय्यद, सहीम मुनावर सय्यद, विश्वास अशोकराव खोसे, वैभव पाटणकर आणि प्रसाद प्रवीण तुजारे यांचा समावेश आहे.
या सर्व खेळाडूंना राहाता रायफल असोसिएशनचे व डी.के. स्पोर्ट्स क्लबचे सीईओ तथा क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. दीपक रणपिसे यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले. तसेच असोसिएशनचे विश्वस्त प्रा. सुशांत क्लबचे प्रशिक्षक साहिल बेग, कार्तिक भुसारी व प्रसाद गाढे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार ॲड. गौरव बोर्डे यांनीही खेळाडूंना वेळोवेळी मार्गदर्शन केले.
शूटिंग या खेळामध्ये अचूकता, एकाग्रता, मानसिक स्थैर्य, शिस्त आणि सुरक्षिततेला विशेष महत्त्व असते. या सर्व बाबींचा विचार करून खेळाडूंना नियमित सराव व तांत्रिक प्रशिक्षण दिले जात आहे. जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून राहाता तालुक्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा प्रशिक्षकांनी व्यक्त केली.
निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे राहाता तालुक्यातील क्रीडाप्रेमी,पालक, प्रशिक्षक व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत असून,आगामी राज्यस्तरीय स्पर्धा व सेफ्टी कोर्ससाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
