परदेशातून राज्यकर्त्यांचे नातेवाईक बोलावले गेले आहेत. ७५ हजारांपर्यंत विमान तिकीटाचे रमणे देऊन. त्यांच्याहीसाठी फुकट पॅटर्न जोरात आहे.मंचाला नाव सावित्रीबाईचे क्रांतिज्योती आणि (बिले पास करून घेण्यासाठी धडपड) मात्र संमेलनाला अघळपघळ 'मराठी' नाव धारण करण्याची लबाडी आहे.या कैचीत हे संमेलन ढोंग वठवले गेले आहे..आणि म्हणे यातून मराठी माणसे जगभरातून एकत्र आली की उद्योग भानगडी करार होतील... ज्यांच्या ओळखी आता दडवून साहित्य संमेलनात मिरवले जात आहेत ते परदेशी मराठी नातेवाईक पंधराशे घेणाऱ्या बहिणींपेक्षा लाचार आहेत.
१)बोलावलेले परदेशी मराठी लोक भाषेबाबत तिकडे काय काम करतात ?
२)त्यांना त्यांच्या तिकडील कार्याबद्दल इकडे एखाद्या सत्रात काही सादरीकरण करण्यासाठी सांगण्यात आले आहे काय?
याची उत्तरे शून्य आहेत.
जे भरत असलेल्या टॅक्सच्या गमजा मारत आता तेच संघुटे साऱ्या फुकट मंडपात विखुरले आहेत.फुकट लुटवण्यासाठी एकही संधी हे सरकार सोडत नाहीय.बळेच महाविद्यालय, शाळेतले भाषा शिक्षक वेठीला धरले आहेत. त्यांच्या सोबत हिंडणारी चार सहा पोरे दिनवाणी इथे तिथे आपल्याशी संबंधित नसलेले विचारामृत कानामागे टाकत फिरत आहेत. कविसंमेलनात एखादं दुसरा महेश केळुस्कर बोचणारी कविता वाचत आहे.तोंडी लावायला एखादा गेल्या अडीच वर्षांतल्या काळाने 'बीभत्स' म्हणजे काय अनुभवले असा एखादा शब्द टाकून कवी मंचावरून बाजूला होत आहे.. हातात गंडमाळा घालणारे हात उंचावून कवी बोलत आहेत. कुणी 'कडे' घालून आम्हीही तुमच्यात सामील अशी ग्वाही दिलीय.देव्हारा, पंचारती, अधिष्ठान सारख्या शब्दांना कवितेत उत आलाय.
श्रीराम-भक्त मारूतीच्या घोषणा देणारा, शिवरायांना तलवार भवानीने दिली म्हणणारा, तुकोबा सदेह वैकुंठाला गेला म्हणणारा कुणी कऱ्हाडे ब्राह्मण तिथे मल्लिनाथी करत मंचावरच्या ज्येष्ठ कवींना तुमचे दिवस संपले असल्याचा इशारा देत आहे...साऱ्यांच्या नकला त्यांच्या तोंडासमोर सुरू आहेत...कवींचे घसे बसलेत की दाबले कुणी?फुटाणे यांनी 'दोन मिनिटे' होण्यापूर्वी महात्मा फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लावलेल्या समाधी शोधाची आणि टिळकांनी नंतर समाधी जिर्णोद्धार करण्यासाठी पुढाकार घेऊन वर्गणी गोळा केली आणि बुडीत बँकेत सदर वर्गणी डुबली अशी कडवट तार छेडली पण खालून पब्लिक ढिम्म काहीतरी आक्रीत ऐकतोय असा मंडपात भाव निर्माण झालेला. असे तिथे प्रेक्षक...एकूणच पुढच्या विश्व संमेलनात परत बोलवा असे सुचविणारे काठी टेके म्हातारे कवी खरोखर घरी बसलेले असतील.लोक तसेही येथे जमलेले नाहीत.जे कढ आणून भावसौंदर्याच्या विश्वात मग्न आहेत त्यांची अब्रू गेलीय या मंडपात,कवी धर्माला ते जागलेले नाहीत.
आज इथे हे अवघे पाहून उद्या परत यायची इच्छा राहिली नाहीय.
फेसबुकला डिंग्या मारणारे काही बंडखोर प्राध्यापक लेखक या गर्दीत भगवे झेंडे उडवणाऱ्या आपल्याच 'पेड' पोरांच्या गर्दीने एफसी रस्त्याच्या बाहेर ढकलले जात असलेले या दिवसाने दाखविले.काशी करा तुमच्या विद्रोहाची आता आताच खरी वेळ आलीय लढायची...
संतोष पवार
फोन-९४२२७९६६७८
