पुर्वी लहानपणी मुलंमुली पेपर सोपा जावा म्हणून पॅडला तुळशीचं पान लावायचे.जेंव्हा एखाद्याला असं वाटतं की पेपरला जाताना तुळशीचं पान सोबत ठेवलं तर मला बरं वाटेल तेंव्हा ती झाली त्याची श्रद्धा पण योगायोगाने त्याने तयारी केलेल्या धड्यांवरचेच जास्तीत जास्त प्रश्न आले.
आणि तो समजायला लागला की तुळशीचे पान सोबत असल्यामुळेच मला पेपर सोपा गेला तर ही झाली त्याची अंधश्रद्धा.हाच प्रयोग त्याने अजून १० जणांना करायला लावला आणि ते १० सुद्धा पेपरला तुळशीचं पान घेवून परीक्षेला गेले. त्यातील ८ जणांना पेपर अवघड गेला तर ते नशिबाला दोष देतात; तुळशीच्या पानाला नाही.
आणि प्रारब्ध म्हणून गप्प बसतात पण ज्या दोन जणांना पेपर सोपा जातो ते मला अनुभूती आली म्हणून गावभर तुळशीच्या पानांचे महत्त्व सांगतात. आपण अभ्यास केला होता यापेक्षा ते तुळशीच्या पानाचे महत्व सांगतात. तेंव्हा तो झाला अंधश्रद्धेचा प्रसार.लोकांना कष्टाच्या मार्गापेक्षा सोपा मार्ग आणि शॉर्टकट हवा असतो.
त्यामुळे अशा अंधश्रद्धा सहज फोफावतात.मग तुळशीच्या पानाच्या प्रसारासाठी लोक एकत्र येवून काम करतात .तेंव्हा ते बनतात अंधश्रद्धेचे वाहक प्रसार खूप मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर ट्रस्ट स्थापन होतो. हे झाले लोकांच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचे मार्केटिंग.विज्ञान शिकलेले डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ यावर विश्वास ठेवतात.
तो झाला त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे स्वतःची चिकित्सा वृत्ती, कार्यकारण भाव जाणून घेण्याची वृत्ती जागृत ठेवून आणि बुद्धीप्रामाण्यवादाला महत्त्व देणे.
जेव्हा एखादा शास्त्रज्ञ, डॉक्टर किंवा अन्य व्यक्ती तुळशीचे पान सोबत ठेवण्यामागे काय सायन्स आहे,
विज्ञान आहे, हे सांगत सुटतो त्याला म्हणतात छद्मविज्ञान, म्हणजे फसवे विज्ञान. विज्ञान आहे असा फक्त भास निर्माण करणे आणि लोकांची फसवणूक करणे. लोकं जागृत झाले तरी यालाच विज्ञान समजतील. आणि ट्रस्टचं हीत अबाधित राहील.
छोट्या छोट्या टीम तयार करून तुळशीच्या पानाचे महात्म्य सांगणारी पुस्तके लिहून घेणे आणि आपल्या अनुयायांना त्यांचे वाचन करायला सांगणे याला म्हणतात भक्तगण कायम स्वरुपी ट्रस्टशी बांधून ठेवणे.
ट्रस्टच्या बेहिशोबी पैशामधील थोडा पैसा अन्नछत्र चालवण्यासाठी वापरून उर्वरित पैसा स्वतःची संघटना आणि राजसत्ता बळकट करायला वापरणे याला म्हणतात षडयंत्र. जे तुम्हा आम्हाला ओळखायचे आहे.
या मागचे गौडबंगाल ओळखायचे आहे .
प्राजक्ता पाटील
त.टीप.- वरील पोस्टमध्ये कोणत्याही धर्माचा किंवा विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख नाही.पोस्टचा हेतू अंधश्रद्धा निर्मूलन आहे.त्यामुळे पोस्ट स्वतःच्या अंगावर कोणी ओढून घेत असल्यास मी जबाबदार नाही .
