खरच औरंगजेबची कबर उखडणार?
जगातील इतर देशातील सरकारे विकसनशिल देशाकडे कुच करताना दिसत आहेत.तेथील जनताही सरकारच्या बरोबर आहे.अन्न, वस्त्र,निवारा या मूलभूत गरजां बरोबरच प्रत्येकाच्या हाताला काम कसे मिळेल याचाच तेथील सरकारे विचार करताना दिसतात.
अमेरिकेत रिकामे बसणे जनतेला परवडत नाही आणि चिनमध्ये इतकी मोठी लोकसंख्या असूनही त्यांना घराघरात काम आहे म्हणून त्यांनी जगातील बाजारपेठा काबीज केल्या आहेत.आणि भारतात नेमकी याच्या उलट परिस्थिती आहे.
इथले सरकार जनतेतच भांडण लावत आहे.आपल्या अंगीकृत संघटनांच्या माध्यमातून जबरदस्तीने वाद उकरुन काढत आहेत.देशाचा विकास गेला खड्ड्यात जनतेच्या वादात आपली पोळी कशी भाजता येईल याचाच विचार सरकार करत आहे. परंतु जनता जागृत असून जनतेला इतिहास माहीती आहे.
काही दिवसांपासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी त्यांची खिल्ली उडवली जात आहे. हे कमी होते म्हणून आबू आसिम आझमी सारख्या प्यादा कडून जबरदस्तीने औरंगजेबाची वाहवा करण्यात आली.महाराजांचा खुलेआम अवमान करणाऱ्यांना मोकाट सोडून आबू आझमीवर लुटूपुटूची कारवाई करण्यात आली.
हाच धागा पकडून बोलके पोपट नवनीत राणा,राणे तसेच रक्ताचे वंशज आणि खुद्द विद्यमान मुख्यमंत्रीच औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याविषयी बोलून आगीत तेल ओतून गेले.आणि आता तर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने ज्यांचा महाराजांशी काहीही संबंध नसताना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट सरकारलाच औरंगजेबाची कबर उखडण्याबाबत अंतिम मुदत दिली आहे.सरकारने औरंगजेबाची कबर न उखडल्यास कारसेवकांसारखी कारवाई करण्यात येईल अशी धमकीही देण्यात आली.म्हणजेच काहीही करुन छत्रपतींचा इतिहास मिटवून टाकायचा असा खुद्द सरकार आणि त्यांच्या बगलबच्चांनी चंग बांधला आहे.
खरे!तर पुरातत्व विभागाच्या नियमावली नुसार गड किल्ले या सर्व बाबी संरक्षित आहेत.त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल करता येत नाही.त्यामुळे औरंगजेबाची कबर सुध्दा पुरातत्व विभागाच्या आखत्यारित येते. तिला उखडणे शक्य नाही. तरीही बजरंग दल, विहिंप सारख्या महाराष्ट्र बाहेरच्या संघटना सरकारला असे अल्टिमेटम देऊन मुद्दाम वाद उकरुन काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
औरंगजेबाची कबर उखडून फेकायचीच ना?मग टाईमपास कशाला करताय,कुणीअडवलयं? राज्यात,देशात तुमचीच सरकारे आहेत ना? मग नाटक कशाला?उखडा आणि मोकळे व्हा.उगाच अल्टिमेटम देऊन अधिवेशनात इतर ज्वलंत विषयावरुन लक्ष हटविण्याचे काम सुरु आहे.सर्व केंद्रीय संस्था तुमच्याच ताब्यात आहेत,काही तरतुदी आडव्या येत असतील तर घटना दुरुस्ती करा,वटहुकुम काढा,बुलडोझर फिरवा.तुम्हाला कोणीही अडवलेलं नाही.मात्र नियत साफ नसल्याने फक्त पेटवापेटवी करायची,धार्मिक वाद पेटवायचा,काही सुपारीबाज चँनेलवर लिहून दिलेल्या स्क्रिप्टवर वाद घडवून आणायचा आणि जातीय दंगल कशी होईल याचे प्रयत्न करायचे.
अबू आझमी सारख्यांना औरंगजेबाच्या कबरीमुळे बळ मिळत असेल तर बाबांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी इतका मोठा शौर्याचा इतिहास घडविला आहे,ज्याची दखल आख्खा जग घेत आहे,त्यांच्या रणणितीवर अभ्यास सुरु आहे, शिवाय ठिकठिकाणी महाराजांचे भव्य पुतळे उभारले आहेत मग त्या पुतळ्यांकडे पाहून तुमच्या अंगात हत्तीचे बळ येत नाही का? ते पुतळे पाहून तुमचे रक्त सळसळत नाही का?जर नसेल तर मग कशाला औरंगजेबाची कबर उखडून महाराजांचा शौर्याचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न चालविला आहे. तुमची नौटंकी जनता जाणून आहे. कितीही प्रयत्न केला तरी दंगल काही भडकणार नाही.
औरंगजेबाच्या सैन्यात वतनदारीसाठी किती मराठा मनसबदार होते?आणि महाराजांच्या मावळ्यांमध्ये किती मुसलमान होते यासाठी जरा इतिहासाची पाने चाळा. महाराजांवरुन तुमचे घाणेरडे राजकारण बंद करा. महाराजांकडे अठरापगड जाती, बारा बलुतेदार आणि विविध जाती धर्माची लोकं मावळे म्हणून स्वराज्यासाठी लढत होती. त्यामुळे जनतेला इतिहास माहीत आहे. तुम्ही आगीत तेल ओतण्याचे बंद करा. औरंगजेबाची कबर आमच्या महाराजांच्या शौर्याचा जिताजागता उदाहरण आहे. भावी पिढीला हे दाखविता येईल. त्याला नामशेष करायचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक जण पेटून उठेल हे लक्षात ठेवा. तुर्तास इतकेच.!
महेंद्र कुंभारे
संपादक तथा कामगार नेते
भिवंडी फोन नं.8888182324
