आठ वर्षांच्या खंडानंतर दाढच्या हजरत अदन मदन बाबांचा यात्रोत्सव सुरू

Cityline Media
0


दाढ बुद्रुक (प्नतिनिधी)-राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक पंचक्रोशीतील सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या हजरत अदन-मदन बाबा दरगाह यात्रोत्सव आठ वर्षांच्या खंडानंतर अखेर सुरू झाल्याने पंचक्रोशीतील भाविकांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून गुरुवार दि. ३ एप्रिल ते ५ एप्रिल २०२५ या दरम्यान हा यात्रोत्सव भरणार असल्याने गावात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
रविवार दि. ३० मार्च रोजी गुढीपाडव्याला माजी खा.सुजय विखे पा.यांच्या हस्ते ग्रामदैवतांना नारळ वाढवून या यात्रोत्सवाला आरंभ होणार आहे.या दरम्यान गुरुवार दि. ३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत संदल मिरवणूक, शुक्रवार ४ एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस असून रात्री ९ ते पहाटे ४ वाजेपर्यंत भव्य तकतराव मिरवणूक, रात्री ९ ते २ वाजेपर्यंत अंजलीराजे नाशिककर यांचा मोफत लोकनाट्य तमाशा होणार आहे. तकतराव मिरवणूक संपल्यानंतर पहाटे ४ वाजता शोभेच्या दारूची भव्य आतषबाजी होणार आहे.

शनिवार दि.५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता हजेऱ्यांचा कार्यक्रम तर सायंकाळी ४ वाजता जंगी कुस्ती हगामा होऊन यात्रेची सांगता होणार आहे.या यात्रेनिमित्त विविध खेळण्यांची,महिला सौंदर्य प्रसाधने,मिठाई आदी व्यावसायिक दुकाने थाटतात. दाढ बुद्रुक पंचक्रोशीतील अनेक नागरिक या यात्रेत अदन मदन बाबांच्या दर्शनाबरोबरच खरेदीचा आनंद लुटतात.मंदिर परिसरात साफसफाई रंगरंगोटीचे काम जोरदारपणे सुरू आहे.

या भव्य यात्रोत्सवात व्यापारी वर्गाने आपली दुकाने लावावीत व यात्रेची शोभा वाढवावी,असे आवाहन यात्रा कमेटी व दाढ बुद्रुक ग्रामस्थांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!