नाशिक (दिनकर गायकवाड) नासर्डी ते पाथर्डी दरम्यान प्रभाग क्रमांक ३१ मध्ये गुंडगिरीचे प्रमाण वाढत आहे. या गुंडगिरीस तातडीने आळा घालावा,अशी मागणी चेतनानगर विकास मंडळाच्या वतीने पोलिसांकडे नुकतीच करण्यात आली आहे.
इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना दिलेल्या निवेदनात अध्यक्ष रमेश जगताप व पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की प्रभाग क्रमांक ३१ मध्ये गुन्हेगारी, सोनसाखळ्या खेचणे, विविध चौकांत व सार्वजनिक उद्यानांत टवाळखोरांचा उपद्रव वाढत आहे.
नुकताच पाथर्डी फाटा येथे वारकरी शेतकरी बाकेराव यांच्यावर टवाळखोरांनी चॉपरने हल्ला केला, तर यापूर्वीही चेतनानगर सभागृहाजवळ पाण्याच्या टाकीखाली मध्यरात्रीच्या सुमारास दारू पिऊन टवाळखोर पार्टी गोंधळ घालत होती. हा प्रकार नागरिकांनी माजी नगरसेवक अमोल जाधव यांना सांगताच त्यांनी टवाळखोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, तसेच डॉ. भागवत सभागृह जवळच्या उद्यानात काही गुंडांनी रात्रीच्या सुमारास हैदोस घातला होता.
येथील श्रीकृष्ण मंदिराच्या आवारात व उद्यानात अनेक तरुण दिवसा आणि रात्री उशिरापर्यंत टवाळखोरी करीत असतात,अशा अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व सहकारी पोलिसांनी प्रभाग क्रमांक ३१ मधील विविध ठिकाणी पोलीस गस्त वाढवून कायदा व सुव्यवस्था सुधारावी, अशी मागणी चेतनानगर विकास मंडळाच्या वतीने माजी नगरसेवक अमोल जाधव, माजी नगरसेविका संगीता जाधव, मंडळाचे अध्यक्ष रमेश जगताप, बाळासाहेब काळे व पदाधिकारी, तसेच दिर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद अत्तरदे, अजित पाटील, विष्णू उगले, सुभाष पाटील, गोपीनाथ बच्छाव आदींनी इंदिरानगर पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
