लोणी प्रतिनिधी जीवनात येणाऱ्या अडचणींना सामोरे जात संघर्ष करत मागे न सरता यश मिळवणे हा बाबासाहेबांनी आपल्याला मंत्र दिल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी,गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी केले.
लोणी येथे बुद्ध वंदना ग्रुप यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.प्रसंगी डॉ. आंबेडकर - माझी लेखन प्रेरणा या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. आपल्याला आयुष्यात आलेले अनेक वाईट अनुभव सांगताना जातीय विद्वेशाला महापुरुषांच्या विचारांनीच नेस्तनाबूत करता येते,असे प्रतिपादन त्यांनी केले. येणारी पिढी आता समाजमाध्यमे वा इंटरनेट यांपेक्षा पुस्तकांमध्ये कशी गुंतली जाईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
पुस्तकांमुळे वैचारिक प्रगल्भता निर्माण होऊन जात - धर्मापलीकडे माणूस म्हणून जगणे शक्य होईल,असे यावेळी त्यांनी सांगितले.माणसाने जीवनात मोठी स्वप्ने आणि ती साध्य करण्यासाठी जिद्द आणि चिकाटी अंगी बाळगावी,असा सल्ला त्यांनी दिला.दरम्यान आपल्याला फक्त नाव - आडनावामुळे कशा संधी नाकारल्या गेल्या, याचे विवेचन करताना व्यवस्थेबद्दल अत्यंत नाराजी व्यक्त केली.
दरम्यान बाबासाहेब सौदागर यांनी आपली काही निवडक प्रसिद्ध गीते ऐकवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या गीतांनी जगामध्ये पोहचवणाऱ्या कवी वामनदादा कर्डक यांना समाजाने तसेच शासनाने दुर्लक्षित केले,अशी खंत देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.
या भिम जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक.साहेबराव निकम गुरुजी तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मधुकर अनाप यांची प्रमुख उपस्थिती होती.या जयंती सोहळ्यात नव्याने बौद्ध महासभेच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या उपसकांचा तसेच काही निवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान मान्यवरांच्या सत्कारात शाल,हार- फुलांना फाटा देत पुस्तके देण्यात आली व नवा पायंडा पाडण्यात आला.बुद्ध वंदना ग्रुपने अत्यंत वैचारिक भान राखून बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारणा अभिप्रेत असा जयंती सोहळा साजरा केल्याने ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुद्ध वंदना ग्रुप लोणीच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश मुंतोडे यांनी केले.प्रास्ताविक प्रा. सुनील ब्राम्हणे यांनी तर आभार प्रा. डॉ.संदीप तपासे यांनी मानले.
