अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने केले होते स्पर्धेचे आयोजन
आश्वी (प्नतिनिधी)अंधश्रध्दा व भोंदूगिरी विरोधात सातत्याने जनजागृती करुन,महाराष्ट्र नरबळी इतर अमानूष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळ्या जादूविरोधात अधिनियम २०१३ चा कायदा आणणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने आयोजित केलेल्या 'विवेकरेषा' या राज्यस्तरावरील महाराष्ट्रातील पहिल्याच विवेकवादी व्यंगचित्र स्पर्धेत खुल्या गटात चित्रकार आनंद गायकवाड यांनी प्रथम क्रमांक मिळवला.मार्मिकचे व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांच्या संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळाला.
पुणे येथील बालगंधर्व कलादालनात होणाऱ्या या प्रदर्शनामध्ये अंधश्रद्धा, भोंदुगिरी आणि अज्ञानाविरुद्ध रेखाटलेल्या सुमारे १५० निवडक व्यंगचित्रांचा समावेश असेल. ५, ६ व ७ एप्रिल रोजी होणाऱ्या या तीन दिवशीय प्रदर्शनात भारतातील निवडक २५ प्रतिभावंत व्यंगचित्रकारांचे व्यंगचित्र
प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून,स्पर्धेतील लहान व मोठ्या गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांशिवाय राज्यातील इतर निवडक व्यंगचित्रकारांच्या कलाकृतीला यात स्थान मिळणार आहे.
या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (५ एप्रिल) सकाळी ११ वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते होणार आहे. या राज्यस्तरिय स्पर्धेत १० ते १६ वर्ष वयोगटात हृदय मनोज भंडारी (प्रथम), मानसी दत्तात्रय पाटील (द्वितीय) तर अफताब हमीद शेख याने तृतीय क्रमांक मिळवला. १६ वर्षांवरील खुल्या गटात आनंद गायकवाड, संगमनेर यांनी प्रथम, तुषार कुरणे यांनी द्वितीय, तर नीरज सबनिस यांनी तृतीय क्रमांक मिळवला. या विजेत्यांच्या चित्रांशिवाय या प्रदर्शनात दीपक नागलकर, धनराज गरड, नरेंद्र साबळे, प्रशांत कुडकर, सुरेश राऊत व संगमनेरच्या अरविंद गाडेकर यांच्या चित्रांचा समावेश आहे.